सामान्यांत रमणारे अजितदादा; छ. संभाजीनगरमध्ये इमरती-भजी खातानाची हळवी आठवण ताजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 20:29 IST2026-01-28T20:28:57+5:302026-01-28T20:29:38+5:30
Ajit Pawar Death: "चांगला चहा टपरीवरच मिळतो!" अजितदादांच्या निधनानंतर संभाजीनगरमधील प्रसिद्ध इमरतीची आठवण पुन्हा ताजी

सामान्यांत रमणारे अजितदादा; छ. संभाजीनगरमध्ये इमरती-भजी खातानाची हळवी आठवण ताजी
छत्रपती संभाजीनगर : अजित पवार यांच्या निधनाने अवघा महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. शिस्तप्रिय, कडक प्रशासक अशी ओळख असलेल्या अजितदादांचा एक अत्यंत साधा, हळवा आणि सामान्यांशी नाळ जोडणारा कोपरा छत्रपती संभाजीनगरकरांनी जवळून अनुभवला होता. त्यांच्या निधनानंतर त्या आठवणी ताज्या होत आहेत.
९ ऑक्टोबर २०१८ रोजी ‘संविधान बचाव रॅली’च्या निमित्ताने अजित पवार आणि खा. सुप्रिया सुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये आले होते. कार्यक्रमानंतर कोणताही व्हीआयपी प्रोटोकॉल, ताफा किंवा पंचतारांकित हॉटेलचा तामझाम न ठेवता दादांची गाडी थेट जुन्या शहरातील एका प्रसिद्ध मिठाई दुकानाकडे वळली. सामान्य ग्राहकांतच अजितदादांनी इम्रती, जिलेबी-भज्यांचा आस्वाद घेतला. यावेळी त्यांच्यासोबत आ. सतीश चव्हाण व आ. विक्रम काळे हे दोघेही होते. त्यांनी शहरातील या इम्रती व भज्यांचा इतिहास सांगितला.
चव टपरीवरच्या चहातच असते...
याच वेळी पत्रकारांशी बोलताना दादांनी आपली साधी जीवनदृष्टी स्पष्ट केली होती. “फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये फक्त तामझाम असतो, पण खरं प्रेम आणि चव ही छोट्या हॉटेल्समध्ये किंवा टपरीवरच्या चहातच मिळते.’’ त्यांचे हे वाक्य त्यांच्या आयुष्याचं सार सांगून जातं. सत्तेच्या सर्वोच्च शिखरावर असूनही त्यांचं मन सामान्यांच्या वस्तीत आणि साध्या चवीत रमत होतं. यावेळी सुप्रिया सुळे यांनी हॉटेलमध्ये इम्रती बनविणाऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्यासोबत सेल्फीही काढली होती. या ८ वर्षांपूर्वीच्या आठवणी शहरवासीयांच्या मनात ताज्या झाल्या. शिस्तीचा धाक, निर्णयांची धडाडी आणि मनातला साधेपणा यांचा संगम असलेले अजित पवार आता फक्त आठवणीत उरले आहेत. पण शहरातील या आठवणी कायम लोकांच्या मनात जिवंत राहतील.
एवढे आवडले की, इम्रती, भजे पार्सलही नेले
अचानक अजित पवार व सुप्रिया सुळे आमच्या हॉटेलमध्ये आल्या, तेव्हा आम्ही त्यांची व्यवस्था कशी करायची, यामुळे गोंधळलो होतो. आम्ही त्यांच्या बसण्याची स्वतंत्र व्यवस्था करीत असताना दादा म्हणाले की, काही गरज नाही. आम्ही बाकावर बसूनच इम्रती खाऊ. त्यांनी पार्सलही नेले. त्यांचे हे साधे जगणे मला आयुष्यात खूप शिकवून गेले.
सुभाष कच्छवा, हॉटेल व्यावसायिक
दादांची ती फिलॉसॉफी
टपरीवरचा चहा आणि छोटं हॉटेल यावेळी पत्रकारांशी बोलताना दादांनी आपलं साधेपण अधोरेखित केलं होतं. ते म्हणाले होते, "तुम्हाला फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये तामझाम पाहायला मिळेल, तिथले पदार्थ उत्तम असतीलच असे नाही. पण उत्तम खाद्य हे छोट्या हॉटेलमध्ये आणि चांगला चहा हा टपरीवरच मिळतो." दादांचे हे शब्द आजही त्यांच्या सामान्यांशी असलेल्या नाळची साक्ष देतात.
लोकनेता आता केवळ आठवणीत
खासदार सुप्रिया सुळे यांनीही यावेळी 'बहीण-भावाच्या' या नात्यातील प्रवासाचे किस्से सांगितले होते. आज दादांच्या निधनानंतर मिठाई शॉपच्या त्या रिकाम्या खुर्च्या पाहून जुन्या छत्रपती संभाजीनगरमधील नागरिक आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भावूक झाले आहेत. महाराष्ट्राचा हा 'साधा' आणि 'धाडसी' लोकनेता आता केवळ आठवणींच्या रूपात आपल्यात उरला आहे.