विमानतळाचे ‘छत्रपती संभाजी महाराज’ नामकरण होणार; लवकरच सुधारित परिपत्रक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 15:35 IST2025-12-04T15:34:26+5:302025-12-04T15:35:01+5:30
काही दिवसांपूर्वीच रेल्वे स्टेशनचे नामकरणही ‘छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन’ करण्यात आले.

विमानतळाचे ‘छत्रपती संभाजी महाराज’ नामकरण होणार; लवकरच सुधारित परिपत्रक
छत्रपती संभाजीनगर : चिकलठाणा विमानतळाचे ‘छत्रपती संभाजीनगरविमानतळ’ असे नामकरण करण्याचे केंद्र सरकारकडून परिपत्रक निघाले. परंतु ‘छत्रपती संभाजी महाराज विमानतळ’ असे नामकरण करण्याची मागणी होत आहे. त्यामुळे ‘छत्रपती संभाजीनगर विमानतळ’ असे नामकरण करणे सध्या भारतीय विमानतळ प्राधिकरणाने थांबविले आहे. लवकरच नामकरणाचे सुधारित परिपत्रक निघणार आहे.
शहराचे नामांतर ‘छत्रपती संभाजीनगर’ झाल्यानंतर विविध शासकीय कार्यालये, विभाग आणि संस्थांची नावे बदलण्यात आली. काही दिवसांपूर्वीच रेल्वे स्टेशनचे नामकरणही ‘छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन’ करण्यात आले. काही दिवसांपासून हा विषय चर्चेत आहे. विमानतळ प्राधिकरणाकडे ‘औरंगाबाद विमानतळ’ अशी नोंद आहे.
नव्या नावामुळे विमानतळाला शहराच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाशी जोडणारा नवा दर्जा मिळणार आहे. देशातील विविध विमानतळांवरून आरक्षण करताना लवकरच नवे नाव दिसेल, अशी शक्यता आहे. विमानतळावर नवीन फलक, माहितीफलक, तिकीट आरक्षण प्रणालीतील सुधारणा तसेच वेबसाइटवरील बदलांसाठी तयारी सुरू झाल्याचेही सूत्रांनी सांगितले. याविषयी विमानतळाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी याविषयी बोलण्यास नकार दिला.
सोशल मीडियावर पोस्ट
‘अभिमानास्पद, आता आपले विमानतळही झाले छत्रपती संभाजीनगर विमानतळ....!’ अशा पोस्ट बुधवारी सामाजिक माध्यमांवर व्हायरल झाल्या. स्थानिक नागरिक, प्रवासी तसेच सामाजिक संस्था, राजकीय नेते, कार्यकर्त्यांनी या पोस्ट केल्या.
सुधारित परिपत्रक लवकरच
‘छत्रपती संभाजीनगर विमानतळ’, असे नामकरण करण्याचे परिपत्रक केंद्र शासनाच्या नागरी उड्डयन मंत्रालयातर्फे निघाले आहे. परंतु ते परिपत्रक थांबवून ठेवले आहे. कारण ‘छत्रपती संभाजी महाराज विमानतळ’ असे नामकरण हवे आहे. असे परिपत्रक लवकरच निघेल.
- डाॅ. भागवत कराड, खासदार