रस्त्याच्या मध्यभागी येणार एअर व्हॉल्व्ह; नॅशनल हायवे अथॉरिटी सांगा, वाहतूक कशी सुरू राहील?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 19:38 IST2024-12-23T19:38:03+5:302024-12-23T19:38:47+5:30
मार्किंगच्या केंद्रभागी एअर व्हॉल्व्ह येत असेल, तर रस्ता किती शिल्लक राहणार, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात येतोय.

रस्त्याच्या मध्यभागी येणार एअर व्हॉल्व्ह; नॅशनल हायवे अथॉरिटी सांगा, वाहतूक कशी सुरू राहील?
छत्रपती संभाजीनगर : जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत ३४ किमी २५०० मिमी व्यासाची जलवाहिनी टाकण्यात आली. आता या जलवाहिनीवर ठिकठिकाणी एअर व्हॉल्व्ह बसविण्यात येणार आहेत. त्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने काही दिवसांपूर्वीच रस्त्यावर मार्किंग केली. एअर व्हॉल्व्हचे सेंटर रस्त्याच्या मध्यभागी येत आहे. व्हॉल्व्हच्या चारही बाजूंनी सुरक्षित सिमेंटच्या भिंती उभारण्यात येणार आहेत. अशा परिस्थितीत रस्त्यावरून वाहतूक कशी सुरळीत राहील, याचे उत्तर नॅशनल हायवेकडे नाही.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जलवाहिनीवर रस्ता तयार करण्याचा प्रताप नॅशनल हायवेने केला. उलट औरंगाबाद खंडपीठात शपथपत्र देण्यात आले, त्यात जलवाहिनी रस्त्यात येत असल्याचे म्हटले आहे. ‘लोकमत’ ने ८ दिवसांपासून या विषयावर वृत्तमालिका सुरू केली आहे. या प्रकरणात रोज वेगवेगळ्या बाजू समोर येत आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला नॅशनल हायवेने आखून दिलेल्या जागेतच २५०० मिमी व्यासाची जलवाहिनी टाकण्यात आली. त्यावर एअर व्हॉल्व्हसुद्धा येणार आहेत, हेही नॅशनल हायवेला कळविण्यात आले होते. त्याचे नकाशेही सादर करण्यात आले. त्यानंतरही नॅशनल हायवेने अलीकडेच जलवाहिनीवर रस्ता तयार केला. मजीप्राने उर्वरित जलवाहिनीचे काम पूर्ण करणे आणि युद्धपातळीवर एअर व्हॉल्व्ह बसविण्याचे काम सुरू केले. त्यासाठी काही दिवसांपूर्वीच मार्किंगही करण्यात आली. या भागातील जागरूक नागरिकांनी मार्किंगची छायाचित्रे ‘लोकमत’ला उपलब्ध करून दिली. मार्किंगच्या केंद्रभागी एअर व्हॉल्व्ह येत असेल, तर रस्ता किती शिल्लक राहणार, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात येतोय. एअर व्हॉल्व्हच्या चारही बाजूंनी सिमेंटचे बांधकाम येईल. १२ बाय १२ फुटांचे हे बॉक्स बांधकाम राहील. जलवाहिनीवर एकूण ८ ठिकाणी असे मोठे एअर व्हॉल्व्ह बसविले जातील. या शिवाय ८० ठिकाणी बटर फ्लाय व्हॉल्व्ह राहतील.
सेंटर अलाइनमेंट चुकीची
३० मीटरच्या रस्त्यात ८ मीटर जागा जलवाहिनीसाठी देण्यात आली होती. २२ मीटर जागा नॅशनल हायवेकडे रस्त्यासाठी शिल्लक होती. तेवढ्याच जागेत रस्ता केला असता, तर सेंटर अलाइनमेंट ११ मीटरवर आले असते. आता नॅशनल हायवेने दुभाजक १५ मीटरवर ठेवले आहेत. त्यामुळे एका बाजूला रस्ता लहान होईल.
जलवाहिनीचे डिझाइन ३० वर्षांचे
नॅशनल हायवेने पुढील १५ वर्षे डोळ्यासमोर ठेवून रस्ता डिझाइन केला. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने पुढील ३० वर्षे शहराची लोकसंख्या डोळ्यासमोर ठेवून जलवाहिनी डिझाइन केली आहे.