वडिलांच्या इच्छेखातर बनविले शेतीउपयोगी स्प्रेअर्स; उत्पादन पाहून बिल गेट्सही भारावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 17:07 IST2025-03-20T17:07:02+5:302025-03-20T17:07:33+5:30
बिल गेट्स फाउंडेशनला २५ वर्षे झाल्याने ते भारतात आले होते. फाउंडेशनने निवडलेल्या स्टार्टअपच्या प्रगतीचा त्यांनी आढावा घेतला.

वडिलांच्या इच्छेखातर बनविले शेतीउपयोगी स्प्रेअर्स; उत्पादन पाहून बिल गेट्सही भारावले
छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा ॲक्सिलरेटर फॉर ग्रोथ ॲण्ड इन्क्युबिशन कौन्सिल (मॅजिक) या केंद्राच्या पहिल्या स्टार्टअपपैकी एक असलेल्या नियो फार्मटेकने ‘ग्रीनोव्हेशन एनर्जी चॅलेंज’मध्ये टॉप १० मध्ये स्थान मिळविले. नियोच्या नावीन्यपूर्ण पेस्टिसाइड स्प्रे पंप पाहून जागतिक टेक उद्योजक बिल गेट्स भारावले. त्यांनी १७ मार्च रोजी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन संस्था (आयएआरआय) येथे आयोजित कार्यक्रमात नियो सोलार स्प्रेअर आणि नियो बाहुबली स्प्रेअर या अत्याधुनिक उत्पादनांचा स्वतः चालवून अनुभव घेतला. जिल्ह्यातील चितेगाव येथील योगेश गावंडे या नवउद्योजकाने शेती उत्पादनात लोकल टू ग्लोबल झेप घेतली. बुधवारी गावंडे यांचा २०१८ पासूनचा प्रवास सीएमआयएच्या सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत उलगडण्यात आला.
बिल गेट्स फाउंडेशनला २५ वर्षे झाल्याने ते भारतात आले होते. फाउंडेशनने निवडलेल्या स्टार्टअपच्या प्रगतीचा त्यांनी आढावा घेतला. नियो फार्मटेकचा प्रवास २०१८ मध्ये सुरू झाला. जेव्हा संस्थापक योगेश गावंडे अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्षात होते. त्यांचा कॉलेज प्रोजेक्ट मॅजिकच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण उत्पादनामध्ये विकसित झाला. मिलिंद कंक, सुनील रायठठ्ठा, प्रसाद कोकीळ, रितेश मिश्रा आणि आशिष गर्दे यांनी त्याला व्यावसायिक दृष्टिकोनातून मार्गदर्शन केल्याचे सांगण्यात आले.
मॅजिकचे संचालक प्रसाद कोकीळ म्हणाले की, विद्यार्थिदशेतून महाविद्यालयीन प्रोजेक्टला प्रत्यक्ष प्रॉडक्टमध्ये रूपांतरित केले. मॅजिक संचालक रितेश मिश्रा म्हणाले, नियो फार्मटेकचा हा प्रवास मेक इन इंडिया उपक्रमातील नवसंशोधनाचे उदाहरण आहे.
३ कोटींची उलाढाल
नियो फार्मटेकने ५ हजार युनिट्सची विक्री करीत १०० जणांना रोजगार देत ३ कोटींचा टर्नओव्हर केल्याने सांगून संस्थापक योगेश गावंडे यांनी मॅजिकचे आभार मानले. गेल्या दोन वर्षांत, गेट्स फाउंडेशनच्या मदतीने नियो फार्मटेकने उत्तर प्रदेश आणि ओडिशा येथे उत्पादन पोहोचविले आहे. हजारो शेतकऱ्यांना नावीन्यपूर्ण कृषी उत्पादनासाठी यंत्र उपलब्ध करून दिले.