फेर नोंदीसाठी तलाठ्याच्या नावाने ५ हजाराची लाच घेताना एजंटला रंगेहात पकडले
By बापू सोळुंके | Updated: May 5, 2025 18:48 IST2025-05-05T18:48:16+5:302025-05-05T18:48:54+5:30
ही कारवाई छत्रपती संभाजीनगरजवळील गांधेली येथील तलाठी सज्जा येथे करण्यात आली.

फेर नोंदीसाठी तलाठ्याच्या नावाने ५ हजाराची लाच घेताना एजंटला रंगेहात पकडले
छत्रपती संभाजीनगर: दोन भूखंडाचा महसूल दप्तरी फेर नोंद घेण्यासाठी तलाठ्याच्या नावाने पाच हजार रुपये लाच घेताना एका खाजगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी सापळा रुचून रंगेहात पकडले. ही कारवाई गांधेली येथील तलाठी सज्जा येथे करण्यात आली. याप्रकरणी चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.
देविदास भाऊराव बकाल (५२,रा.मयुरपार्क) आणि तलाठी विनोद शेषराव मुळे (४९) अशी आरोपींची नावे आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून प्राप्त माहितीनुसार तक्रारदार महिलेच्या पतीच्या नावे गांधेली शिवारात भूखंड आहेत. गट नंबर १३३ मध्ये भूखंड क्रमांक ४० आणि ४१ चे फेर घेण्यासाठी त्यांनी गांधेली तलाठी सज्जा कार्यालय येथे अर्ज दिला होता. एक महिना झाला तरी या फेरची नोंद तलाठी मुळे यांनी घेतली नसल्याचे तक्रारदार यांना समजले. यानंतर त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. तलाठी मुळे आणि एजंट बकाल हे लाचेची मागणी करीत असल्याचे तक्रारीत नमूद केले होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंच पाठवून लाचेच्या मागणीची पडताळणी केली. तेव्हा देविदास बकाल यांनी तलाठी विनोद मुळे यांच्यासाठी आणि स्वत:साठी ५ हजार रुपये लाचेची मागणी केली.
लाच घेताना रंगेहात पकडले
दरम्यान, ५ मे रोजी देविदास बकाल याने तक्रारदार महिलेकडून पाच हजार रुपये लाच घेतली. याचवेळी दबा धरुन बसलेल्या साध्या वेशातील पोलिसांनी बकाल यास लाचेच्या रक्कमेसह रंगेहात पकडले. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक सुरेश नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक शांतीलाल चव्हाण, हवालदार रविंद्र काळे, अशोक नागरगोजे यांनी केली.
प्रत्येक तलाठ्याकडे झिरो तलाठी
प्रत्येक तलाठी कार्यालयात झिरो तलाठी म्हणून खाजगी व्यक्ती काम करताना दिसतात. हा खाजगी व्यक्ती तलाठ्याचे दप्तरही सांभाळतो. सामान्य नागरीकांची कामे करण्यासाठी तलाठ्याच्या नावाने पैसेही घेतो. जे पैसे देतील त्यांचीच कामे तातडीने मार्गी लागतात. असाच प्रकार या गांधेली सज्जा येथे सुरू असताना ही कारवाई झाल्याचे एसीबीकडून समजले.