आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 11:52 IST2025-05-14T11:51:30+5:302025-05-14T11:52:11+5:30

माणुसकीच्या नात्याने परक्यांनी दिले जीवदान; माणसांचा सहवास नसल्याने शब्दांचा उच्चारच विसरली, बाल कल्याण समितीकडून उपचार सुरू

After the death of her mother, a gatimand girl was tortured to death by her father, tied her up in an animal pen | आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात

आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात

छत्रपती संभाजीनगरआईच्या मृत्यूनंतर पाच वर्षांची गतिमंद रिहाना (नाव बदलले आहे) वडिलांच्या अमानुष वागणुकीची शिकार झाली. बीड जिल्ह्यातील एका गावात तिच्या व्यसनी बापाने तिला जनावरांच्या गोठ्यात पायाला दोरी बांधून डांबले होते. तिला अक्षरश: केळी, टरबुजाच्या साली खाण्यास देऊन जिवंतपणी मृत्यूच्या वेदना दिल्या. मात्र, एका महिलेने तिचा आक्रोश ऐकून दत्तक घेण्याचा प्रयत्न केला. सहा महिन्यांनंतर, सोमवारी रिहानाचा दामिनी पथकाच्या मदतीने कायदेशीर पुनर्वसन होण्याचा मार्ग मोकळा झाला.

रिहानाच्या आईचे काही वर्षांपूर्वी निधन झाले. ती गेवराईची होती. व्यसनी वडिलांना रिहाना डोईजड झाली. रिहानाचा नैसर्गिक मृत्यू होण्याच्या उद्देशाने त्याने तिचे हालहाल केले. रिहानाला अक्षरशः जनावरांच्या गोठ्यात पायाला दोरी बांधून ठेवणे सुरू केले. सकस आहार, माणसांच्या सहवासाच्या अभावी रिहानाची बौद्धिक, शारीरिक वाढच झाली नाही. ती बोलू शकत नव्हती. दरम्यान, पैठणच्या हिना नामक महिलेला हे समजले. हिना माहेरी गेलेली असताना तिला सतत रडण्याचा आवाज येत होता. तिने गोठ्यात जाऊन पाहिल्यावर रिहाना दिसली. रिहानाची अवस्था पाहून तिला मायेचा पाझर फुटला. तिने तिच्या वडिलांकडे ताबा मागितला. निर्दयी बापाने बॉण्डवर लिहून देत रिहानाला हिनाकडे सुपुर्द केले.

अचानक बदलामुळे रिहानाचे वागणे बदलले
हिनाच्या घरी आल्यानंतर माणसांमध्ये आलेल्या रिहानाच्या वागण्यात मोठा बदल घडला. अधिक हिंस्त्र झाली होती. इतरांना मारहाण करून, सतत आदळआपट करू लागली. त्यामुळे हिना यांनी हज हाऊसजवळील खालिद अहमद यांच्या अनाथ आश्रमात तिला नेऊन सोडले. खालिद यांनी तिच्यावर उपचार केले. मात्र, आश्रमात सर्व मुलेच असल्याने त्यांनी दामिनी पथकाच्या उपनिरीक्षक कांचन मिरधे यांना संपर्क केला. मिरधे यांच्यासह अंमलदार निर्मला निंभोरे, लता जाधव, सरिता कुंडारे, अंबिका दारुंटे, प्रियंका भिवसने, पूजा जाधव, मनीषा बनसोडे परळकर यांनी धाव घेत तिला ताब्यात घेतले.

बदल होतोय
उपचार, समुपदेशनानंतर रिहानाच्या वागणुकीत बदल होत आहे. ती थोडं थोडं बोलण्याचा प्रयत्न करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. महिला-बाल कल्याण समिती अध्यक्ष ॲड. आशा शेरखाने यांच्या सहकार्याने रिहानाची भारतीय सेवा केंद्र येथे राहण्याची व्यवस्था करून पुनर्वसन केले.

Web Title: After the death of her mother, a gatimand girl was tortured to death by her father, tied her up in an animal pen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.