मंत्री विखे, सावे यांच्या आश्वासनानंतर क्रांती चौकातील मराठा आरक्षण चिंतन आंदोलन स्थगित

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 13:00 IST2025-03-01T12:57:12+5:302025-03-01T13:00:01+5:30

मराठा क्रांती मोर्चा, मराठा क्रांती ठोक मोर्चा आणि मराठा समाजातील विविध संघटनांनी एकत्र येत २३ फेब्रुवारीपासून क्रांती चौक येथे मराठा आरक्षण चिंतन आंदोलन सुरू केले होते. तेथे समन्वयक रमेश केरे पाटील हे उपोषण करीत होते.

After the assurance of Minister Radhakrushna Vikhe, Atul Save, Maratha reservation protest at Kranti Chowk suspended | मंत्री विखे, सावे यांच्या आश्वासनानंतर क्रांती चौकातील मराठा आरक्षण चिंतन आंदोलन स्थगित

मंत्री विखे, सावे यांच्या आश्वासनानंतर क्रांती चौकातील मराठा आरक्षण चिंतन आंदोलन स्थगित

छत्रपती संभाजीनगर : जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे बैठक लावण्याचे आश्वासन दिल्यानंतर मागील रविवारपासून क्रांती चौकात सुरू असलेले मराठा आरक्षण चिंतन आंदोलन स्थगित करण्यात आले. उपोषणकर्ते रमेश केरे पाटील यांनी मंत्रिमहोदयांच्या हस्ते ज्यूस पिऊन उपोषण सोडले.

मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्यावे, मराठा आंदोलकांवरील गुन्हे रद्द करावे, सारथी विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी लावावे, अण्णासाहेब पाटील महामंडळासाठी आर्थिक तरतूद करावी, संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा, इत्यादी मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चा, मराठा क्रांती ठोक मोर्चा आणि मराठा समाजातील विविध संघटनांनी एकत्र येत २३ फेब्रुवारीपासून क्रांती चौक येथे मराठा आरक्षण चिंतन आंदोलन सुरू केले होते. तेथे समन्वयक रमेश केरे पाटील हे उपोषण करीत होते.

मराठा आरक्षण विषयावर सरकारने आजपर्यंत काढलेले जी.आर. आणि आजपर्यंत दिलेले आरक्षण याविषयी आंदोलनस्थळी समन्वयक राजेंद्र दाते पाटील यांनी पीपीटीद्वारे सादरीकरण केले. उपोषणाच्या पाचव्या दिवशी गुरुवारी रात्री मंत्री विखे पाटील यांनी उपोषणस्थळी जाऊन केरे यांची भेट घेतली होती. तेव्हा मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतो, असे त्यांनी सांगितले होते.

दरम्यान, आज शुक्रवारी दुपारी मंत्री विखे हे क्रांती चौकात आले आणि त्यांनी मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी बैठक आयोजित करण्याची तयारी दर्शविल्याचे सांगितले. ते अन्य मागण्यांसंदर्भातही येत्या अधिवेशनात निर्णय घेण्याचे आश्वासन त्यांनी दिल्याचे सांगत उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असल्याचे लक्षात घेत आंदोलन स्थगित करण्याची आणि उपोषण मागे घेण्याची तयारी आंदोलकांनी दर्शविली. काही वेळानंतर मंत्री अतुल सावे तेथे आले. यावेळी दोन्ही मंत्र्यांच्या हस्ते केरे यांनी लिंबूपाणी पिऊन उपोषण सोडविले.

Web Title: After the assurance of Minister Radhakrushna Vikhe, Atul Save, Maratha reservation protest at Kranti Chowk suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.