छत्रपती संभाजीनगरमध्ये खामनंतर सुखना नदीपात्राला गतवैभव मिळणार; खोली-रुंदीकरणाला वेग
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 12:05 IST2025-11-04T12:03:14+5:302025-11-04T12:05:16+5:30
पहिल्या टप्प्यात साडेपाच किमी काम होणार, जाणून घ्या संपूर्ण आराखडा

छत्रपती संभाजीनगरमध्ये खामनंतर सुखना नदीपात्राला गतवैभव मिळणार; खोली-रुंदीकरणाला वेग
छत्रपती संभाजीनगर : खाम नदीपात्राला ज्या पद्धतीने गतवैभव मिळवून देण्यात आले, त्याच पद्धतीने सुखना नदी पात्राचेही काम महापालिकेने खाजगी एजन्सीमार्फत सुरू केले आहे. पहिल्या टप्प्यात हर्सूल ते चिकलठाणा विमानतळाच्या भिंतीपर्यंत साडेपाच किमी नदीपात्र खोल-रुंद करण्यात येणार आहे.
हर्सूल तलाव ओसंडून वाहू लागल्यानंतर पात्राच्या आसपास असलेल्या वसाहतींमधील नागरिकांना स्थलांतरित करावे लागत होते. मागील पाच ते सहा वर्षांमध्ये महापालिकेने खाम नदीपात्राचा कायापालट केला. छावणी लोखंडी पुलापासून पुढे वाळूजपर्यंत हे काम सुरू आहे. या प्रकल्पाला आंतरराष्ट्रीय पुरस्कारही प्राप्त झाले. राज्य शासनानेही या कामाची दखल घेतली.
इको सत्त्व, व्हेरॉक कंपनी, छावणी परिषद या संस्थांच्या सहकार्याने हे काम सुरू आहे. सुखना नदीपात्रातही अनेक अतिक्रमणे झाली. पात्राची अवस्था नाल्यासारखी झाली. त्यामुळे आतापर्यंत दोन वेळेस नारेगाव भागात नदीपात्राचे पाणी शिरले. अलीकडेच प्रशासक जी. श्रीकांत यांनी सुखना नदीपात्रालाही खामसारखे काम करण्याचे निश्चित केले. त्यादृष्टीने कामही सुरू झाले.
सुखनेचे पात्र रुंदीकरण असे होणार..
हर्सूल ते चिकलठाणा विमानतळ संरक्षक भिंतीपर्यंत ५ ते साडेपाच किमी मनपा हद्दीतील सुखना नदी वाहते. नदीपात्राचे रुंदीकरण, खोलीकरण करणे, पिचिंग करणे, परिसरात वृक्षारोपण करणे आदी विविध कामे करण्यात येणार आहेत. दिवाळीनंतर या कामाला वेग देण्यात आला असून, १ किमीपर्यंतचे रुंदीकरण व खोलीकरणाचे काम पूर्ण केले आहे. चिकलठाणा भागात काळी माती अधिक आहे. पिचिंग करण्यासाठी लागणारे दगड मिटमिटा येथील सफारी पार्कच्या ठिकाणाहून आणण्यात आले.
अतिक्रमणे कधी काढणार?
सुखना नदीपात्रात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे आहेत. २५ पेक्षा अधिक अतिक्रमणे आहेत. ही अतिक्रमणे कधी काढणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. अतिक्रमणे काढल्याशिवाय पात्रात काम करणे अशक्य आहे.