गुरांना चारापाणी करून पाय धुवायला गेला अन् शेततळ्यात बुडाला; १५ वर्षीय मुलाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 16:05 IST2025-07-01T15:58:07+5:302025-07-01T16:05:01+5:30

भावाने जोरात आरडाओरड केली. मात्र, मदतीसाठी आजूबाजूची शेतकरी पोहोचेपर्यंत उशीर झाला होता

After feeding cattle, he went to wash his feet and drowned in a farm pond; 15-year-old boy dies | गुरांना चारापाणी करून पाय धुवायला गेला अन् शेततळ्यात बुडाला; १५ वर्षीय मुलाचा मृत्यू

गुरांना चारापाणी करून पाय धुवायला गेला अन् शेततळ्यात बुडाला; १५ वर्षीय मुलाचा मृत्यू

कचनेर : पाय धुण्यासाठी गेलेल्या १५ वर्षीय शाळकरी मुलाचा पाय घसरून शेततळ्यात पडल्याने बुडून मृत्यू झाला. ही घटना खोडेगाव (ता. छ.संभाजीनगर) येथे सोमवारी घडली. हर्षद रमेश वीर असे मृत मुलाचे नाव आहे.

हर्षद हा नववीत शिकत होता. सोमवारी दुपारी तो शाळा सुटल्यानंतर लहान भावासह शेतात गेला होता. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास दोघा भावंडांनी गुरांना चारापाणी केले. त्यानंतर हर्षद पाय धुण्यासाठी शेततळ्यावर गेला. तेथे पाय घसरून तो शेततळ्यात पडला. यावेळी त्याच्या भावाने जोरात आरडाओरड केली. मात्र, आजूबाजूच्या शेतकऱ्यांना पोहोचण्यास वेळ झाला. तोपर्यंत हर्षद बुडाला होता.

बाबासाहेब नजन, गजानन ढगे, कृष्णा वीर, शिवाजी ढगे, पोलिस पाटील संतोष वीर आदींनी हर्षदला शेततळ्याबाहेर काढून चिकलठाणा येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. शाळेत हुशार असलेल्या हर्षदच्या जाण्याने वीर कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. याप्रकरणी चिकलठाणा पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास बीट जमादार विक्रम जाधव हे करत आहेत.

Web Title: After feeding cattle, he went to wash his feet and drowned in a farm pond; 15-year-old boy dies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.