गुलाल, आतषबाजी आणि घोषणांच्या गजरात मनोज जरांगे मध्यरात्री संभाजीनगरात; रुग्णालयात दाखल, आरामाचा सल्ला
By शांतीलाल गायकवाड | Updated: September 3, 2025 09:23 IST2025-09-03T08:21:13+5:302025-09-03T09:23:02+5:30
‘एक मराठा लाख मराठा’च्या गगनभेदी घोषणांनी परिसर दुमदुमला

गुलाल, आतषबाजी आणि घोषणांच्या गजरात मनोज जरांगे मध्यरात्री संभाजीनगरात; रुग्णालयात दाखल, आरामाचा सल्ला
शांतीलाल गायकवाड
छत्रपती संभाजीनगर : मराठा समाजाच्या ओटीत आरक्षण टाकणारे मनोज जरांगे पाटील यांचा ताफा मंगळवारी मध्यरात्री १ वाजता शहरातील गॅलेक्सी रुग्णालयासमोर येऊन थांबला आणि पाटील, पाटील, पाटील, एक मराठा लाख मराठा...च्या गगनभेदी घोषणांनी अग्निहोत्र चौक परिसर दुमदुमला. पाच दिवस उपोषण केल्याने बोलण्याच्या मन:स्थितीत नसलेले जरांगे यांना तातडीने आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. पुढील १५ दिवस त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला असल्याचे डॉक्टरांनी ‘लोकमत’ला मंगळवारी मध्यरात्री सांगितले.
जरांगे यांना घेऊन आलेली ॲम्ब्युलन्स रुग्णालयासमोर येताच जोरदार आतषबाजी व घोषणांनी परिसर दणाणून गेला. यावेळी तरुणांची मोठी गर्दी होती. फटाक्याची आतषबाजी करून जरांगे यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. जरांगे येणार म्हणून रुग्णालयातही फुलांची पखरण करण्यात आली होती.
जरांगे यांच्यावर उपचार करणारे डाॅ. गोविंद चौरे म्हणाले की, उपचार करण्यासाठी त्यांना आयव्ही देण्यासाठी सुई लावताना नस सापडत नव्हती. सुई टोचली तेव्हा वेदनेने जरांगे व्याकूळ झाले. उपोषणामुळे जरांगे यांची प्रकृती बिघडली असून त्यांचा रक्तदाब वाढला आहे. रक्तशर्कराही कमी झाला आहे. १५ दिवस त्यांना आराम करण्याची, तसेच उपचाराची गरज आहे.
रुग्णालय परिसरात गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सहायक पोलिस आयुक्त नवले, सहायक आयुक्त मनीष कल्याणकर, पोलिस निरीक्षक सचिन कुंभार व पोलिस निरीक्षक भुजंग यांच्यासह मोठा फौजफाटा परिसरात तैनात होता.