औराद शहाजानीतील पहिल्या निवडणुकीलाही स्थगिती

By Admin | Updated: January 18, 2015 00:29 IST2015-01-18T00:16:40+5:302015-01-18T00:29:35+5:30

औराद शहाजानी : जिल्ह्यातील तिसऱ्या क्रमांकाची कृषी बाजारपेठ म्हणून औराद कृषी उत्पन्न बाजार समितीचा उल्लेख केला जातो़ या बाजार समितीच्या

The adjournment of the first elections in Aurad Shahjani | औराद शहाजानीतील पहिल्या निवडणुकीलाही स्थगिती

औराद शहाजानीतील पहिल्या निवडणुकीलाही स्थगिती


औराद शहाजानी : जिल्ह्यातील तिसऱ्या क्रमांकाची कृषी बाजारपेठ म्हणून औराद कृषी उत्पन्न बाजार समितीचा उल्लेख केला जातो़ या बाजार समितीच्या स्थापनेपासून अद्यापही निवडणूक झालेली नाही़ प्रथमच निवडणूक होणार असल्याने त्याची प्राथमिक प्रक्रिया तयार झाली होती़ परंतु, या बाजारपेठेअंतर्गतच्या १८ गावांतील विविध कार्यकारी सोसायट्याच्या निवडणुका होणे बाकी असल्यामुळे याविषयी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल झाली होती़ खंडपीठाने या बाजार समितीच्या निवडणुकीस तत्पूर्ती स्थगिती दिली आहे़
महाराष्ट्र-कर्नाटक दोन्ही राज्यातील सीमाभागातील शेतकऱ्यांची महत्त्वाची बाजारपेठ म्हणून औराद कृषी उत्पन्न बाजार समितीकडे पाहिले जाते़ या बाजारपेठेत निलंगा तालुक्यातील ५८ गावांचे कार्यक्षेत्र आहे़
तसेच कर्नाटक व सीमाभागातील ४० गावांचा शेतीमाल येतो़ १९९७ साली निलंगा कृऊबामधून विभागणी होऊन औराद शहाजानी कृउबा स्वतंत्र झाली आणि मंडळ स्थापन करण्यात आले़
तेव्हापासून कधी शासकीय तर कधी अशासकीय प्रशासकाची या बाजार समितीवर निवड झाली़ सद्य:स्थितीला शासकीय प्रशासक कार्य पाहत आहेत़ प्रथमच या बाजार समितीची निवडणूक होत असल्याने प्राथमिक मतदार यादी जाहीर करण्यात आली़ त्यानंतर जिल्हा उपनिबंधकांनी अंतिम यादी जाहीर केली होती़
याच दरम्यान, औराद येथील दीपक चांडक यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली की, सदर बाजार समितीतील कार्यक्षेत्रातीत १८ विविध कार्यकारी सोसायट्यांच्या निवडणुका होणे बाकी आहे़ तीन सोसायट्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम लागल्याने बाजार समितीची निवडणूक नंतर घ्यावी़ या याचिकेमुळे खंडपीठाने तात्पूर्ती स्थगिती देऊन निर्णय पुढे ढकलला आहे़ त्यामुळे प्रशासनाने निवडणूक कार्यक्रम थांबविला आहे़ त्यामुळे निवडणुकीचे वाजलेले बिगुल पुन्हा थंड झाले आहे़ (वार्ताहर)

Web Title: The adjournment of the first elections in Aurad Shahjani