छत्रपती संभाजीनगरात कारवाईचा बडगा; रिक्षाचालक बीड बायपास, वाळूज, ग्रामीणकडे वळले
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 16:09 IST2025-06-17T16:09:28+5:302025-06-17T16:09:58+5:30
दोन दिवसांत ६७९ रिक्षांची तपासणी, रविवारी रात्रीतून १३ रिक्षा जप्त, ५६ हजार रुपयांचा दंड वसूल

छत्रपती संभाजीनगरात कारवाईचा बडगा; रिक्षाचालक बीड बायपास, वाळूज, ग्रामीणकडे वळले
छत्रपती संभाजीनगर : शहरातील मुख्य मार्ग, चौकांमध्ये पोलिसांनी रिक्षाचालकांवर कारवाईचा बडगा उगारताच काही रिक्षाचालकांनी शहराबाहेरील मार्गांवर आपला व्यवसाय वळविल्याचे दिसून येत आहे. बीड बायपास, केंब्रिज परिसरासह वाळूज परिसरात अधिक रिक्षा चालवणे सुरू केले. त्यात रविवारी रात्रीतून वाहतूक पोलिसांनी सर्वाधिक १०३ रिक्षांची तपासणी करत ६ रिक्षा जप्त केल्या.
रिक्षा व्यवसायातील गुन्हेगारांचे वाढते प्रमाण नियंत्रणात आणून शिस्त लावण्यासाठी शहर पोलिसांनी मोहीम हाती घेतली आहे. रोज सिडको चौक, बाबा चौक, रेल्वे स्थानक परिसरात स्थानिक पोलिस ठाण्यांचे कर्मचारी, मुख्यालयाच्या अंमलदारांसह कारवाई करीत आहेत. यात रविवारी सायंकाळी ७ ते रात्री ११ दरम्यान देखील विशेष मोहीम राबवून कारवाई करण्यात आली. यात एकूण ६७९ रिक्षाचालकांची तपासणी करण्यात आली. यात ३५१ चालक नियमबाह्य रिक्षा चालवताना सापडल्याचे सहायक पोलिस आयुक्त धनंजय पाटील यांनी सांगितले.
एकूण तपासलेल्या रिक्षा : ६७९
कारवाई : ३५१
जमा रिक्षा : १३
एकूण दंडाची रक्कम : २ लाख ६८ हजार ६०० रुपये.
वसूल रक्कम : ५५ हजार ९००
बाबा चौकाने घेतला माेकळा श्वास
बेशिस्त रिक्षाचालकांनी बाबा चौकात वाटेल तेथे रिक्षा उभे करणे सुरू केले होते. प्रामुख्याने मिलकॉर्नरकडे घेणाऱ्या वळणासह रेल्वे स्थानकाकडून बाबा चौकात येणाऱ्या चौकात दोन्ही बाजूने रिक्षा उभ्या राहतात. सहायक पोलिस निरीक्षक सचिन मिरधे यांनी चौकात बेशिस्तपणे रिक्षा उभे करणाऱ्यांवर कठोर कारवाई केल्याने सोमवारी दोन्ही बाजू रिकाम्या झाल्याने अन्य वाहनचालक सहज वळण घेऊ शकले.