दिल्ली गेटवर जमावातून एक दगड येताच कारवाईला ब्रेक; तासाभराने मोठ्या बंदोबस्तात पाडापाडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 15:06 IST2025-07-08T15:06:20+5:302025-07-08T15:06:43+5:30

संभाव्य धोका ओळखून मनपा, पोलिस अधिकारी मागे हटले. तासाभरात मोठा पोलिस बंदोबस्त बोलावून कारवाई केली.

Action halted as soon as a stone was thrown from the crowd at Delhi Gate; Heavy security forces deployed for an hour | दिल्ली गेटवर जमावातून एक दगड येताच कारवाईला ब्रेक; तासाभराने मोठ्या बंदोबस्तात पाडापाडी

दिल्ली गेटवर जमावातून एक दगड येताच कारवाईला ब्रेक; तासाभराने मोठ्या बंदोबस्तात पाडापाडी

छत्रपती संभाजीनगर : दिल्ली गेट परिसरात रस्ता रुंदीकरणासाठी महापालिका, पोलिसांनी सोमवारी सकाळी ११:३० वाजता कारवाईला सुरुवात केली. यावेळी गेटला लागून असलेल्या तीन मालमत्ताधारकांनी कारवाईला विरोध केला. मनपा अधिकारी मालमत्ता अधिकृत असल्याचे कागदपत्रही पाहायला तयार नव्हते. आसपास मोठा जमाव होता. कारवाईसाठी सरसावताच गर्दीतून एक दगड आला आणि संभाव्य धोका ओळखून मनपा, पोलिस अधिकारी मागे हटले. तासाभरात मोठा पोलिस बंदोबस्त बोलावून कारवाई केली.

हर्सूलकडे जाताना ऐतिहासिक दिल्ली गेटच्या उजव्या बाजूला एक तीन मजली इमारत आहे. त्यात अत्याधुनिक जिम असून, शहरातील अनेक व्हीआयपी मंडळी येथे येतात. इमारत मालकाने मनपाकडे गुंठेवारी अंतर्गत फाइल दाखल केली आहे. त्यामुळे इमारत पाडू नये, असा त्यांचा आग्रह होता. मनपा अधिकारी ऐकत नव्हते. इमारतीला मोठा पोकलेन लावण्यात आला. मालमत्ताधारकाने प्रशासक यांच्याकडे धाव घेतली. त्यांनी गुंठेवारी अंतर्गंत १० लाखांचा धनादेश घेण्याचा आदेश दिला. त्यानंतरही कारवाईसाठी मनपाकडून तयारी सुरू होती. त्यामुळे चिडलेल्या जमावाने एक दगड जेसीबीच्या दिशेने भिरकावला. संभाव्य धोका पाहून पथकाने कारवाई थांबविली. पोलिसांचा मोठा फौजफाटा या भागात तैनात केला. त्यानंतर जिमच्या इमारतीचा दर्शनी भाग पाडून विद्रूप करण्यात आला.

गुंठेवारीही बघितली नाही
जिमच्या बाजूला लागून तीन वेगवेगळ्या इमारती व्यावसायिक आणि निवासी वापरात आहेत. त्यातील एका चहापानाच्या हॉटेलवर कारवाई केली. बाजूलाच गुंठेवारीत अधिकृत केलेली इमारत सलमान हाॅलवरही अचानक जेसीबीने समोरील दुकाने पाडायला सुरुवात केली. इमारत मालक ओरडून गुंठेवारीचे कागदपत्र दाखवतोय, तरी त्याचा उपयोग झाला नाही.

माजी नगरसेवकाची भिंत पाडली
माजी नगरसेवक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते इलियास किरमाणी यांच्या घराला परवानगी आहे. त्यांची संरक्षक भिंतही १५ मीटर अंतरापासून लांब होती. त्यानंतरही मनपाने ती पाडली. या ठिकाणी मनपा चुकीची कारवाई करीत असल्याचा आरोप करीत विरोध झाला.

पोलिसांचा मोठा फौजफाटा
दुपारी १ वाजता पोलिस उपायुक्त अतुल अलूरकर, प्रशांत स्वामी, सहायक आयुक्त संपत शिंदे यांच्यासह वज्र वाहन, दंगा काबू पथक, पोलिस कर्मचारी मोठ्या संख्येने दिल्ली गेट भागात दाखल झाले. या भागाला काही तास छावणीचे स्वरुप आले होते.

वाहतूक वळविली
दिल्ली गेटकडून हिमायत बागकडे जाणारी वाहतूक पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरून वळविली. हिमायत बाग परिसरातील उद्धवराव पाटील चौकापासून दिल्ली गेटकडे येणारी वाहतूकही तणावामुळे बंद करण्यात आली होती.

Web Title: Action halted as soon as a stone was thrown from the crowd at Delhi Gate; Heavy security forces deployed for an hour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.