न्यायालयातून आरोपीने ठोकली धूम
By Admin | Updated: March 18, 2015 00:18 IST2015-03-18T00:16:21+5:302015-03-18T00:18:42+5:30
भूम : दरोड्याच्या प्रकरणात शिक्षा सुनावलेल्या दोन आरोपींनी न्यायालयाच्या आवारातच पोलिसांच्या हाताला हिसका देवून पळ काढला़

न्यायालयातून आरोपीने ठोकली धूम
भूम : दरोड्याच्या प्रकरणात शिक्षा सुनावलेल्या दोन आरोपींनी न्यायालयाच्या आवारातच पोलिसांच्या हाताला हिसका देवून पळ काढला़ यातील एका आरोपीस पोलिसांनी न्यायालयातच ताब्यात घेतले तर दुसऱ्याचा पाठलाग करून बसस्थानकातून जेरबंद केले़ या प्रकरणी दोघांविरूध्द भूम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ही घटना मंगळवारी दुपारी घडली असून, या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे़
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या दरोडा प्रकरणाची भूम न्यायालयात मंगळवारी सुनावणी होणार होती़ त्यासाठी आरोपीत भिवऱ्या पापा काळे (रा़पारधीपेढी भूम) व लाला अर्जुन उर्फ कारकुन्या पवार (रा़बोरखेडा ता़जि़बीड) यांना न्यायालयात आणण्यात आले होते़ न्यायालयात सुनवाईदरम्यान समोर आलेले पुरावे व वकिलांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून भिवऱ्या काळे व लाला पवार या दोघांना न्यायालयाने दोघांना प्रत्येकी पाच वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली होती़ त्यानंतर त्या दोघांना कारागृहात रवानगी करण्यासाठी नेत असताना भिवऱ्या काळे याने पोलिसांच्या हाताला जोरात झटका देवून पळ काढला़ तर त्यानंतर लाला पवार यानेही पळ काढण्याचा प्रयत्न केला़ पोलिसांनी लाला पवार याला न्यायालयाच्या आवारात जेरबंद केले़ तर भिवऱ्या पवार याचा पाठलाग करून भूम बसस्थानकात पकडले़ या प्रकरणी दोघांविरूध्द भूम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दरम्यान, त्या दोघांची उस्मानाबाद येथील कारागृहात रवानगी करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले़ (वार्ताहर)