अपघात की घातपात! चार दिवसांपासून बेपत्ता व्यापाऱ्याचा मृतदेह आढळला घाटनांद्रा घाटात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 19:03 IST2025-04-30T18:59:26+5:302025-04-30T19:03:36+5:30

हा अपघात की घातपात याचे कारण अस्पष्ट असून, विविध तर्कवितर्क लावले जात आहेत.

Accident or conspiracy! The body of a businessman missing for four days from Lohegaon was found at Ghatnandra Ghat | अपघात की घातपात! चार दिवसांपासून बेपत्ता व्यापाऱ्याचा मृतदेह आढळला घाटनांद्रा घाटात

अपघात की घातपात! चार दिवसांपासून बेपत्ता व्यापाऱ्याचा मृतदेह आढळला घाटनांद्रा घाटात

घाटनांद्रा/चिंचोली लिंबाजी ( छत्रपती संभाजीनगर) : लोहगाव (ता.कन्नड) येथून २५ एप्रिलपासून बेपत्ता असलेल्या व्यापाऱ्यांचा मृतदेह घाटनांद्रा येथील घाटातील खोल दरीत स्वतःच्या कारमध्ये कुजलेल्या अवस्थेत आढळला. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. अर्जुन महादू गवळी (वय ३७) असे मयताचे नाव आहे. हा अपघात की घातपात याचे कारण अस्पष्ट असून, विविध तर्कवितर्क लावले जात आहेत.

लोहगाव येथील अर्जुन गवळी यांचा मका खरेदी-विक्रीचा व्यवसाय होता. त्यांचे चिंचोली लिंबाजी येथील मार्केट यार्डमध्ये त्यांचे गवळी ट्रेडिंग कंपनी नावाचे दुकान आहे. २५ एप्रिल रोजी ते नेहमीप्रमाणे सकाळी १०:३० वाजता लोहगाव येथून कार(एमएच २० एचबी ६६६८)ने चिंचोली येथे मार्केटला मका खरेदीसाठी गेले होते. मात्र, दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास कोणाला काही न सांगता ते मार्केटमधून कार घेऊन निघून गेले. रात्री उशिरापर्यंत ते घरी परतलेच नाहीत. कुटुंबीयांनी त्यांचा नातेवाईक व इतरत्र शोध घेतला. मात्र, ते मिळून आले नाहीत. त्यानंतर, २६ एप्रिल रोजी त्यांचे मोठे भाऊ लक्ष्मण गवळी यांनी पिशोर ठाण्यात ते बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविली.

सोमवारी घाटनांद्रा येथील एका तरुणाने घाटनांद्रा घाटातील तीन नंबर वळण रस्त्याला लागून असलेल्या खोल दरीत उडी घेऊन आत्महत्या केली होती. या तरुणाचा मृतदेह बाहेर काढत असताना खाली खोल दरीत कार पडलेली असल्याचे काही जणांच्या लक्षात आले. त्यांनी खाली जाऊन पाहिले असता, छिन्नविछिन्न झालेल्या कारमध्ये मृतदेह आढळला. घटनेची माहिती मिळताच, पिशोर पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली. सिल्लोड ग्रामीण व पिशोर पोलिसांनी स्थानिक तरुणांच्या मदतीने मंगळवारी दुपारी गाडीचे दरवाजे तोडून मृतदेह बाहेर काढण्यात आला. चार दिवसांपूर्वीच हा अपघात झाला असावा, यामुळे मृतदेह कुजलेला होता. त्यामुळे जागेवरच शवविच्छेदन करण्यात आले. सायंकाळी लोहगाव येेथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

अपघात की घातपात चर्चांना उधाण
ज्या दिवशी गवळी हे बेपत्ता झाले, त्याच दिवशी हा अपघात घडला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, व्यापारी असल्याने गवळी यांचा अनेकांशी पैशांचे व्यवहार होते व ते कोणाला काहीही न सांगता निघून गेले होते. त्यामुळे हा अपघात आहे की घातपात, असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे. गवळी यांच्यापश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, दोन भाऊ, एक बहीण असा परिवार आहे.

Web Title: Accident or conspiracy! The body of a businessman missing for four days from Lohegaon was found at Ghatnandra Ghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.