चालक-वाहकाची मानसिकता नसताना कामावर पाठविल्याने झाला अपघात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2022 09:47 AM2022-01-10T09:47:59+5:302022-01-10T09:48:28+5:30

संपकरी कर्मचाऱ्यांचा आरोप; अधिकाऱ्यांनी आरोप फेटाळला

The accident happened due to sending the driver to work without mentality | चालक-वाहकाची मानसिकता नसताना कामावर पाठविल्याने झाला अपघात

चालक-वाहकाची मानसिकता नसताना कामावर पाठविल्याने झाला अपघात

googlenewsNext

औरंगाबाद : लातूर-अंबाजोगाई मार्गावर रविवारी सकाळी अपघात झालेल्या लातूर-औरंगाबाद एस.टी.वरील चालक-वाहकांची  मानसिकता नसताना त्यांना जबरदस्तीने कामावर पाठविण्यात आले. त्यातूनच अपघात झाला, असा आरोप संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी केला. मात्र, एस.टी. महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी हा आरोप फेटाळत, दोन्ही कर्मचारी अनेक दिवसांपासून कर्तव्यावर होते, असे स्पष्ट केले.

सिडको बसस्थानकातून शनिवारी दुपारी तीन वाजता चालक सुभाष गायकवाड आणि वाहक चंद्रशेखर पाटील हे लातूरला बस घेऊन रवाना झाले होते. लातूरहून परत येताना अपघात होईल, असे त्यांना स्वप्नातही वाटले नसावे. या अपघातात वाहक चंद्रशेखर पाटील यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच एस.टी. कर्मचाऱ्यांनी  हळहळ व्यक्त केली. पाटील यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. या घटनेनंतर नातेवाइकांनी अपघातस्थळी धाव घेतली.  

अनेक दिवसांपासून कर्तव्यावर

या दोन्ही कर्मचाऱ्यांना जबरदस्तीने कामावर पाठवण्यात आले. त्यांची कर्तव्यावर जाण्याची मानसिकता नव्हती, असा आरोप संपकरी कर्मचाऱ्यांनी केला; परंतु चालक सुभाष गायकवाड हे १२ डिसेंबरपासून कर्तव्यावर होते, तर वाहक चंद्रशेखर पाटील हे २७ नोव्हेंबरपासून कामावर होते. त्यांना जबरदस्तीने कामावर पाठविले नव्हते. लातूर मार्गावर त्यांना कर्तव्य देण्यात आले होते आणि ते गेले, असे सिडको बसस्थानकाचे आगार व्यवस्थापक लक्ष्मण लोखंडे यांनी स्पष्ट केले. 

धुक्याने केला घात

रविवारी पहाटेपासूनच वातावरणात बदल झालेला होता. दाट धुके पसरले होते. बसचालक समोरील वाहनास ओव्हरटेक करताना समोरून आलेला ट्रक त्यांना दिसला नाही. पुढे जाण्याच्या नादात ट्रकवर डाव्या बाजूला आदळल्याने व जोराची धडक बसल्याने पत्रा फाटत जाऊन दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला.

अभियंता गेला

या भीषण अपघात अंबाजोगाई येथील सदर बाजार येथील तरुण अभियंता आदिल सलीम शेख (२९) याचा मृत्यू झाला. तो शनिवारी (दि. ८) बहिणीला सोडण्यासाठी लातूर येथे गेला होता. रविवारी अंबाजोगाईकडे येत असतानाच त्याचा अपघातात मृत्यू झाला. आदिल हा आईवडिलांचा एकुलता मुलगा होता. सहा महिन्यांपूर्वीच त्याचा विवाह झाला होता.

Web Title: The accident happened due to sending the driver to work without mentality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.