मान्यता एका रुपयाची पण घेतात दोन रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 01:19 IST2017-10-04T01:19:17+5:302017-10-04T01:19:17+5:30
: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील परीक्षा विभागाचे कर्मचारी अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या पैशांची लूट करीत आहेत.

मान्यता एका रुपयाची पण घेतात दोन रुपये
राम शिनगारे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील परीक्षा विभागाचे कर्मचारी अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या पैशांची लूट करीत आहेत. परीक्षक किंवा मॉडरेटर यांनी दिलेले गुण अचूकपणे पडताळून पाहण्यासाठी पगारी कर्मचा-यांना प्रति विद्यार्थी एक रुपया अतिरिक्त मानधन देण्याचा ठराव २००७ मध्ये व्यवस्थापन परिषदेने मंजूर केला. मात्र, प्रत्यक्षात कर्मचारी अधिका-यांच्या संगनमताने प्रति विद्यार्थी दोन रुपये मंजूर करून घेत होते. यावेळी ही गंभीर बाब वित्त विभागाच्या लक्षात आल्यामुळे लाखो रुपये मानधन घेतलेल्या कर्मचा-यांकडून ‘रिकव्हरी’ची प्रक्रिया सुरू केली आहे.
विद्यापीठातील परीक्षा विभाग नेहमीच चर्चेत असतो. परीक्षा प्रकियेतील घोटाळे, अनियमितता, उत्तरपत्रिकांच्या तपासणीतील चलाखीमुळे तो प्रसिद्ध आहे. परीक्षकाने उत्तरपत्रिका तपासल्यानंतर दिलेले गुण अचूक आहेत की नाही, हे तपासण्याचे काम संबंधित विभागातील कर्मचा-यांचे आहे. या कर्मचाºयांनी गुण तपासण्याचे काम अचूकपणे करावे. यासाठी १५ मे २००७ रोजी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत कर्मचा-यांना विद्यार्थ्यामागे १ रुपया अतिरिक्त मानधन देण्याचा निर्णय घेतला. यात ‘टॅब्युलेशन वर्क किंवा चेकिंग’साठी कर्मचा-याला प्रति विद्यार्थ्यासाठी १ रुपया, असा शब्दप्रयोग करण्यात आला आहे.
या निर्णयाचा सोयीनुसार अर्थ लावत एक कर्मचारी गुण वाचतो आणि एक कर्मचारी गुण तपासतो. यामुळे दोन्ही कर्मचाºयांना प्रत्येकी एक रुपया देण्याचा प्रस्ताव परीक्षा विभागातील उपकुलसचिवांनी मंजूर केला. त्यावर परीक्षा नियंत्रकांची स्वाक्षरी घेऊन वित्त विभागाकडे प्रत्येक परीक्षेनंतर तो प्रस्ताव सादर केला जातो. या दोन रुपयांनुसार बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी. अशा सर्वच अभ्यासक्रमांच्या लाखो विद्यार्थ्यांचे प्रत्येकी दोन रुपये परीक्षा विभागातील कर्मचा-यांना मागील ९ वर्षांपासून देण्यात येत आहेत.
हा प्रकार यावर्षी वित्त विभागाच्या लक्षात आल्यावर त्यांनी बिले मंजूर करण्यास नकार दिला. तेव्हा सर्व कर्मचा-यांनी दबाव टाकत परीक्षा विभागातील उपकुलसचिव, परीक्षा संचालकांच्या स्वाक्षरीने प्रति विद्यार्थी दोन रुपये कर्मचा-यांना देण्याची ‘नोट’ तयार केली. त्या ‘नोट’ला कुलगुरूंची मान्यता घेऊन ती वित्त विभागाकडे पाठवली. वित्त विभागाने मात्र ही ‘नोट’ चुकीची असल्याचे कुलगुरूंच्या निदर्शनास आणून दिले. तसेच दोन रुपयांप्रमाणे ‘बी.ए.’ युनिटच्या मंजूर केलेल्या बिलातून अतिरिक्त दिलेली रक्कम कर्मचा-यांकडून वसूल करण्याची प्रक्रिया सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली.