पैठण रोडवरील अतिक्रमण काढण्यास विरोध, पोलीसांसह मनपा अधिकाऱ्यांना शिवीगाळ
By राम शिनगारे | Updated: November 17, 2022 20:04 IST2022-11-17T20:04:17+5:302022-11-17T20:04:40+5:30
पोलिसांसह अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांना शिवीगाळ प्रकरणी दहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल

पैठण रोडवरील अतिक्रमण काढण्यास विरोध, पोलीसांसह मनपा अधिकाऱ्यांना शिवीगाळ
औरंगाबाद : कांचनवाडी, पैठणरोड येथील सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीस अडथळा ठरणारे अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या पथकासह पोलीस अधिकाऱ्यांना प्रचंड शिवीगाळ केल्याची प्रकार बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास घडला. याप्रकरणी महापालिकेच्या अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून सामाजिक कार्यकर्त्यांसह दहा जणांविरोधात शासकीय कामकाजात अडथळा आणल्याचा गुन्हा सातारा ठाण्यात नोंदविला आहे.
महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त सविता सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार; आयुक्तांच्या आदेशानुसार कांचनवाडी परिसरातील अतिक्रमण काढण्यासाठी पथकातील वसंत भोये, रामेश्वर सुरासे, पोलीस निरीक्षक फईम हश्मी यांच्यासह कर्मचारी गेले होते. कांचनवाडीतील उड्डाणपुलाखाली वाहतुकीस अडथळा निर्माण होणाऱ्या पान टपऱ्यांसह इतर दुकाने पथकाने काढली. खुर्च्या, टेबलांसह इतर साहित्य जप्त केले. त्यावेळी टपरी चालक सतीश भालेराव याने विरोध करीत हुज्जत घातली. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ता मोहित त्रिवेदी याने जमावाला उचकविले व जप्त साहित्य गाडीतून काढले. पथकातील अधिकारी समजावून सांगताना मोहित व सुमीत त्रिवेदी यांनी इतरांना घोषणाबाजी करण्यास लावून पोलिसांसह अधिकाऱ्यांना प्रचंड शिवीगाळ केली.
याप्रकरणी वरिष्ठांच्या आदेशावरून सहायक आयुक्त सोनवणे यांच्या तक्रारीनुसार मोहित व सुमित त्रिवेदी या भावांसह सतीश भालेराव, विनोद कारके याच्यासह ३ ते ४ पुरुष, दोन महिला यांच्या विरोधात शासकीय कामकाजात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला. अधिक तपास उपनिरीक्षक संभाजी पवार करीत आहेत.
त्रिवेदीकडून महिलेचीही फसवणूक
गजानन महाराज मंदिर परिसरातील ओम शिवसाई टॉवर येथे शीला पानझाडे यांनी २०१४ मध्ये जीम सुरू केले होते. त्यासाठी पानझाडे तब्बल ७५ हजार रुपये दरमहा भाडे देत होत्या. हे टॉवर सुमीत त्रिवेदी याच्या मालकीचे असून, जीमच्या व्यवसायात पार्टनर करण्यासाठी त्याने दबाव आणला, मात्र पानझाडे यांनी नकार दिल्यानंतर त्यांना त्रास देणे सुरू केले. त्यांच्या जीममधील ३६ लाख १५ हजार ८८५ रुपयांचे साहित्य चोरून नेले. याप्रकरणी पुंडलिकनगर ठाण्यात गुन्हा दाखल आहे. पुंडलिकनगर पोलिसांनी त्रिवेदीच्या घरी छापा मारल्यानंतर जीममधील एसीसह इतर साहित्य सापडले. त्यामुळे पोलिसांनी त्याचा अटकपूर्व जामीन रद्द करण्याची मागणी न्यायालयात केल्याची माहिती तपास अधिकारी सपोनि. शेषराव खटाणे यांनी दिली.