निनावी पत्रावरून २२ मुलींवर अत्याचार उघडकीस, तपासासाठी पोलिस उपायुक्तांना दक्षता पदक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 13:52 IST2025-11-01T13:46:32+5:302025-11-01T13:52:55+5:30
संवेदनशील प्रकरणात उत्कृष्ट तपासासाठी पोलिस उपायुक्त शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक जाहीर

निनावी पत्रावरून २२ मुलींवर अत्याचार उघडकीस, तपासासाठी पोलिस उपायुक्तांना दक्षता पदक
छत्रपती संभाजीनगर : एका निनावी पत्रावरून नामांकित शिक्षण संस्थेतील २२ मुलींवर लैंगिक अत्याचाराचे प्रकरण उघडकीस आणत संवेदनशीलपणे तपास करून आरोपीला तब्बल चार वेळेस जन्मठेपेची शिक्षा लागेपर्यंत पाठपुरावा करणाऱ्या शहर पोलिस दलातील पोलिस उपायुक्त शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांना यंदाचे केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक जाहीर झाले आहे. लोकमत समूहानेदेखील २०२३ मध्ये त्यांना पॉवरफुल वूमन पुरस्काराने सन्मानित केले होते.
केंद्रीय गृहमंत्रालयाने देशभरात पोलिस विभाग, सुरक्षा यंत्रणेत दक्ष, प्रामाणिक, तसेच उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलिस अधिकारी, अंमलदार व जवानांना शुक्रवारी सायंकाळी केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक जाहीर केले. यंदा राज्यातील पाच अधिकाऱ्यांना हे पदक प्राप्त झाले. शहर पोलिस उपायुक्त म्हणून नुकत्याच रुजू झालेल्या वालावलकर यांचा यात समावेश आहे. एम.एस्सी. (फिजिक्स) व कायद्याच्या पदवीधर असलेल्या वालावलकर २००६ मध्ये एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्या. २०१० मध्ये पोलिस दलात दाखल झाल्या.
चार जिल्ह्यांत उल्लेखनीय कामगिरी
कालावधी - सेवा
२०१० ते २०१२ - जिल्हा पोलिस दलात प्रशिक्षणार्थी, तसेच उपअधीक्षक
२०१२ ते २०१४ - उपअधीक्षक, तुळजापूर
२०१४ ते २०१८ - सहायक पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा, सोलापूर शहर
२०१९ ते २०२१ - अपर पोलिस अधीक्षक, नाशिक जिल्हा
२०२१ ते २०२२ - उपायुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग
२०२२ ते २०२५ - अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक विभाग
१ कोटींच्या लाचेचा यशस्वी सापळा
वालावकर नाशिक एसीबी अधीक्षकपदी असताना २०२२ ते २०२५ या कालावधीत तब्बल ३९५ लाचेच्या कारवायांत १०० पेक्षा अधिक वर्ग १ च्या अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली. त्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उच्चपदस्थ अभियंत्याला १ कोटी रुपयांची लाच घेताना पकडले होते.
२२ मुलींना दिला न्याय
सांगलीच्या उपअधीक्षकपदी कार्यरत असताना एका आश्रमशाळेत विद्यार्थिनींवर अत्याचार होत असल्याचे निनावी पत्र प्राप्त झाले होते. वालावलकर यांच्यासह उपनिरीक्षक पल्लवी चव्हाण यांनी तपास करत संस्थेचा अध्यक्ष अरविंद पवारविरोधात २० भक्कम साक्षीदार व ६० पुरावे निष्पन्न केले. त्याने २२ मुलींसोबत गैरप्रकार करून चार मुलींवर बलात्कार केल्याचे निष्पन्न झाले. या संवेदनशील तपासामुळे आरोपीला एकाच गुन्ह्यात चार वेळा जन्मठेप लागली.