छत्रपती संभाजीनगरात शिवाई बसने तरुणाला चिरडले, बसचालक पोलिसांच्या ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 12:51 IST2025-09-22T12:50:22+5:302025-09-22T12:51:10+5:30
महावीर चौकातील घटना, मृत तरुण रिक्षा चालक होता

छत्रपती संभाजीनगरात शिवाई बसने तरुणाला चिरडले, बसचालक पोलिसांच्या ताब्यात
छत्रपती संभाजीनगर : सिडको बसस्थानकातून पुण्याकडे जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या शिवाई बसने तरुणाला चिरडल्याची घटना रविवारी दुपारी ४:३० वाजेच्या सुमारास महावीर चौकात घडली. राहुल अशोक जाधव (वय २८, रा. रांजणगाव शेणपुंजी) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. अपघाताच्या वेळी तो महावीर चौकातून पायी जात असताना, सिडकोहून मध्यवर्ती बसस्थानकाकडे जाण्यासाठी वळण घेणाऱ्या शिवाई बस (एमएच २० जीझेड ०४९६) चालकाने राहुलला धडक दिली. बसचे चाक राहुलच्या डोक्यावरून गेल्याने चेंदामेंदा झाला. वाहतूक शाखेचे अंमलदार माळी, मगरे, महिला अंमलदार खोगरे यांनी धाव घेतली. नागरिकांच्या मदतीने राहुल यांना रिक्षाने घाटीत हलविले. सहायक पोलिस निरीक्षक सचिन मिरधे यांनी घटनास्थळी धाव घेतली.
क्रांती चौक पोलिसांनी शिवाई बसचा चालक नितीन संतोष शेवाळे (रा. मुकुंदवाडी) यास ताब्यात घेतले असून, रात्री उशिरापर्यंत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. राहुलचा दोन वर्षांपूर्वीच विवाह झाला होता. त्याच्या पश्चात पत्नी, लहान मुलगा, आई आणि वडील असा परिवार आहे.