रस्त्यावर 'बर्थ-डे' सेलिब्रेशनदरम्यान दोन गटांत राडा; गारखेड्यात मध्यरात्री दंगा काबू पथक तैनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 11:39 IST2025-07-04T11:38:00+5:302025-07-04T11:39:14+5:30

वाहनाचा कट लागल्यावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी; सूतगिरणी चौकात मध्यरात्री १२ वाजेच्या घटनेने काही काळ तणाव, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह दंगा काबू पथक तैनात

A vehicle touch during a birthday celebration on the road, resulting in a scuffle between two groups | रस्त्यावर 'बर्थ-डे' सेलिब्रेशनदरम्यान दोन गटांत राडा; गारखेड्यात मध्यरात्री दंगा काबू पथक तैनात

रस्त्यावर 'बर्थ-डे' सेलिब्रेशनदरम्यान दोन गटांत राडा; गारखेड्यात मध्यरात्री दंगा काबू पथक तैनात

छत्रपती संभाजीनगर : भर रस्त्यावर ‘बर्थ-डे’ सेलिब्रेशन सुरू असताना गर्दीत एकाला वाहनाचा कट लागल्याच्या कारणावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. घटनेला गंभीर स्वरूप प्राप्त होत काही क्षणांत शेकडोंची गर्दी जमून काहींनी शस्त्र उपसण्याचा प्रयत्न केल्याने परिस्थिती तणावपूर्ण झाली. सूतगिरणी चौकात रात्री १२:०० वाजता घडलेल्या घटनेत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह दंगा काबू पथकाने वेळीच धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, गारखेडा भागातील तरुणांचा एक गट सूतगरिणी चौकात केक कापून वाढदिवस साजरा करण्यासाठी एकत्र जमला होता. रात्री १२:०० वाजेच्या सुमारास हा गट रस्त्यावर वाढदिवस साजरा करीत असताना त्याचदरम्यान रस्त्यावरून जाणाऱ्या एका वाहनाचा त्या गटातील तरुणाला धक्का लागला. या कारणातून त्यांची रस्त्यावर उभ्या तरुणांसोबत बाचाबाची झाली. शिवीगाळ, धमक्यांचे रूपांतर थेट हाणामारीत झाले. वाहनातील तरुणांनी कॉलद्वारे संपर्क साधताच काही क्षणांत आसपासच्या परिसरातून शेकडोंचा जमाव सूतगिरणी चौकात जमा झाला. दोन्ही गटांत तुंबळ हाणामारी झाली. यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाऊन तणावपूर्ण स्थिती झाली.

घटनेची माहिती कळताच जवाहरनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेला वेगळे वळण मिळत असल्याचे लक्षात येताच पोलिस उपायुक्त प्रशांत स्वामी, सहायक आयुक्त डॉ. रणजित पाटील, गुन्हे शाखेचे निरीक्षक संभाजी पवार, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, गारखेड्याचे मुन्शी पटेल घटनास्थळी दाखल झाले. दंगा काबू पथकाने जमावाला पांगवत दोन्ही गटांतील तरुणांना पोलिस ठाण्यात नेले.

दोघे गंभीर जखमी, पोलिस पुत्राचाही समावेश
या मारहाणीच्या घटनेत जवळपास तीन तरुण गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर अन्य जखमींना घाटी रुग्णालयात एमएलसीसाठी पाठवण्यात आले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दोन्ही गटांना शांत करून तक्रार देण्यास सांगितले. या घटनेत एका पोलिस अधिकाऱ्याचा मुलगादेखील होता. परिस्थिती चिघळू नये, यासाठी पोलिस अधिकारी रात्री उशिरापर्यंत ठाण्यात ठाण मांडून होते. दरम्यान, काही क्षणांत शस्त्रधारी तरुण वादात उतरल्याने पुन्हा एकदा शस्त्रतस्करीचा गंभीर मुद्दा उपस्थित झाला आहे.

Web Title: A vehicle touch during a birthday celebration on the road, resulting in a scuffle between two groups

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.