वादळ वाऱ्यात धावत्या कारवर कोसळले झाड, जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्याचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 11:55 IST2025-05-08T11:54:46+5:302025-05-08T11:55:07+5:30
छत्रपती संभाजीनगर शहरात जवळपास सहा ठिकाणी झाडे कोसळली आहेत.

वादळ वाऱ्यात धावत्या कारवर कोसळले झाड, जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्याचा मृत्यू
छत्रपती संभाजीनगर : वादळवाऱ्यासह बुधवारी दुपारी कोसळलेल्या पावसामुळे शहरात सहा ठिकाणी झाडे कोसळली. यात रस्त्यावर एक कारचालक एका झाडाखाली सापडून गंभीर जखमी झाला होता. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. राजू भास्करराव चित्ते (५३) असे मृताचे नाव आहे.
चित्ते कुटुंबासह पैठण रोडवरील साई वृंदावन कॉलनीत कुटुंबासोबत वास्तव्यास होते. दुपारी १ ते १:३० वाजण्याच्या सुमारास चित्ते कारने (एमएच २० - डीव्ही - २६१३) घरून भगवान महावीर चौकमार्गे घाटी रुग्णालयाच्या दिशेने जात होते. त्याच वेळी शहरात वादळ सुटून जोरदार पाऊस पडला. यात शहरात जवळपास सहा ठिकाणी झाडे कोसळली. चित्ते यांनी बाबा चौक ओलांडताच सेवा योजना कार्यालयासमोरील झाड त्यांच्या कारवर कोसळले. यात चित्ते गंभीर जखमी झाले. स्थानिकांनी धाव घेत चित्ते यांना कारमधून बाहेर काढत घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र, चित्ते यांच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने रात्री नऊ वाजता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
चित्ते जिल्हा परिषदेत अकाऊंट अधिकारी होते. त्यांची पत्नी घाटीत नोकरीला आहे. त्यांचा मुलगा आयआयटी दिल्ली येथे शिक्षण घेतो; तर लहानी मुलगी सातवीत शिकते. क्रांती चौक पोलिस ठाण्यात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.