पत्र्याचे शेड ते कोट्यावधींची इमारत; जागतिक दर्जाचे संशोधन केंद्र ठरतंय विद्यापीठाचा गौरव

By राम शिनगारे | Published: June 28, 2023 01:03 PM2023-06-28T13:03:06+5:302023-06-28T13:04:36+5:30

देशातील प्लॅनेट्री बायोडायव्हर्सिटी मिशनचे प्रमुख केंद्र, तब्बल १२० विद्यापीठ आणि देशभरातील सहा विभागीय केंद्रांचे नेतृत्व 'पॉल हेबर्ट सेंटर फॉर डीएनए बारकोडिंग ॲण्ड बायोडायर्व्हसिटी स्टडीज' करत आहे.

A tin shed to a multi-crore building; The Dr. BAMU is proud to be a world-class research center | पत्र्याचे शेड ते कोट्यावधींची इमारत; जागतिक दर्जाचे संशोधन केंद्र ठरतंय विद्यापीठाचा गौरव

पत्र्याचे शेड ते कोट्यावधींची इमारत; जागतिक दर्जाचे संशोधन केंद्र ठरतंय विद्यापीठाचा गौरव

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : चौदा वर्षांपूर्वी टाकाऊ पत्र्यांपासून बनविलेल्या 'पॉल हेबर्ट सेंटर फॉर डीएनए बारकोडिंग ॲण्ड बायोडायर्व्हसिटी स्टडीज' (पीएचसीडीबीएस) संशोधन केंद्र आता पावणे सात कोटी रुपयांच्या महालात स्थालांतरित होत आहे. या केंद्राचे उद्घाटन राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने मंगळवारी झाले. या केंद्रात कोविडच्या काळात तब्बल ५ लाख ५० हजारांपेक्षा अधिक नागरिकांच्या टेस्ट करण्यात आल्या. त्याशिवाय जगभरातील १२०० पेक्षा अधिक संशोधकांनी या केंद्रात संशोधन केले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राणीशास्त्र विभागाचे प्रा. गुलाब खेडकर यांनी २००९ साली 'पीएचसीडीबीएस' केंद्राची स्थापना केली होती. त्यासाठी विद्यापीठाच्या विविध विभागातील भंगारात काढलेली पत्रे, लोखंडी गजांचा वापर केला. त्यासाठी तत्कालीन कुलगुरू डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी मदत केली. १४ वर्षांच्या कालखंडात हे केंद्र देशभरात नावारूपाला आले आहे. देशातील प्लॅनेट्री बायोडायव्हर्सिटी मिशनचे प्रमुख केंद्र बनले असून, तब्बल १२० विद्यापीठ आणि देशभरातील सहा विभागीय केंद्रांचे नेतृत्व करीत आहे.

अशी झाली केंद्राची निर्मिती
डॉ. खेडकर यांना मॉलिक्यूलर जेनेटिक्समधील संशोधनात रस होता. त्यासाठी ते विविध परिषदांना हजेरी लावत. त्यातून त्यांची हैदराबाद येथील सेंटर फॉर सेल्यूलर ॲण्ड मॉल्यूक्यूलर बायोलॉजी (सीसीएमबी) केंद्रात तीन महिन्यांची प्रशिक्षणासाठी निवड झाली. त्यानंतर इस्त्राईलमध्ये संशोधनासाठी शिष्यवृत्ती मिळाली. त्याठिकाणी दोन वर्षे माशांवर संशोधन केले. त्या ठिकाणाहून परतल्यानंतर त्यांनी हे संशोधन केंद्र सुरू केले.

कोट्यवधींचा निधी उभारला
केंद्रात संशोधनासाठी यंत्र खरेदीसाठी रुसा अंतर्गत ४ कोटी ५९ लाख, प्राणिगृहाच्या उभारणीसाठी १ कोटी ३ लाख, कोविडच्या तपासण्या करण्यासाठी २ कोटी, त्यात केवळ १ कोटी २० लाख रुपयांतच खर्च भागवला. त्याशिवाय इमारतीसाठी ६ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी मिळवला. संशाेधनासाठीही कोट्यवधी रुपये मिळवले आहेत.

एक पेटंट प्राप्त, एकाची नोंदणी
केंद्रातील संशोधानाला एक पेटंट प्राप्त झाले तर एकाची नोंदणी झाली असून, ते प्रक्रियेत आहे. त्याशिवाय १२२ आंतरराष्ट्रीय शोधनिबंध प्रसिद्ध झाले. १२०० पेक्षा अधिक संशोधकांनी केंद्रात संशोधन केले आहे. त्यात अमेरिका, जपान, इस्त्राईल, श्रीलंका, थायलंड, नेपाळ, सिरियातील संशोधकांचा समावेश आहे.

आगामी काळात जनुकीय आजारावर संशोधन
कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनात संशोधन केंद्राची वाटचाल सुरू आहे. त्यांच्यामुळेच छोट्याशा जागेतील हे केंद्र मोठ्या संस्थेत स्थलांतरित होत आहे. या केंद्राने बायोडायर्व्हसिटीमध्ये देशाचे नेतृत्व केले पाहिजे. या केंद्रात आरोग्य, पर्यावरण, शेती आणि जैवविविधतेच्या संरक्षणासह मानवाच्या जनुकीय आजारावर आगामी काळात संशोधन होईल.
- डॉ. गुलाब खेडकर, संचालक, पीएचसीडीबीएस, विद्यापीठ.

कोविड टेस्टिंगमध्ये राज्यात अग्रेसर
'पॉल हर्बर्ट सेंटर फॉर डीएनए बारकोडिंग अँड बायोडायव्हर्सिटी स्टडीज' या केंद्राच्या माध्यमातून संशोधन कार्य सुरू आहे. विशेषतः कोविड टेस्टिंग लॅबच्या माध्यमातून सर्वाधिक चाचणी करणारे राज्यातील विद्यापीठाने चालवलेले हे महत्त्वाचे केंद्र आहे. व्हायरॉलॉजी, जीनोम सिक्वेन्सिंग संदर्भात संशोधनाचे काम केंद्राच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर होणार आहे.
- डॉ. प्रमोद येवले, कुलगुरू

हे झाले केंद्रात संशोधन
- मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीकडून मांसजन्य पदार्थांची निर्यात वाढविण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करण्याचा २ कोटी रुपयांचा संशोधन प्रकल्प २००९ मध्ये मिळाला. त्यातूनच केंद्राची सुरुवात.
- ७ हजार ५०० मेडिसिनचा डीएनए बारकोडचा डेटाबेसचा १ कोटी ४५ लाखांचा प्रकल्प
- मागूर माशांच्या जनुकीय अभ्यासासाठी ७२ लाख
- नदीतील माशांच्या वर्गीकरणाच्या अभ्यासासाठी ६५ लाख
- पिकांवरील कीटकांच्या अभ्यासासाठी ८० लाख.
- रेशीम किड्यांचा वाढत्या तापमानात सामना करण्यासाठी जनुकीय सुधारणाच्या अभ्यासासाठी ९३ लाख
- शोभीवंत माशांच्या निर्यातीच्या दृष्टीने जनुकीय वर्गीकरणासाठी ३२ लाख
- समुद्री माशांच्या जनुकीय अभ्यासासाठी ३२ लाख
- मत्स्यजन्य पदार्थातील भेसळ ओळखण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी २५ लाख
- मत्स्य उत्पादन वाढीसाठी संशोधन व विस्तारासाठी ६३ लाख
- मराठवाड्यातील देवणी, लालकंधारी व उस्मानाबादी शेळीच्या संवर्धनासाठी संशोधन सध्या सुरू आहे. त्यासाठी १ कोटी ७९ लाख रुपयांचा निधी प्राप्त.

Web Title: A tin shed to a multi-crore building; The Dr. BAMU is proud to be a world-class research center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.