भरधाव हायवाने पीकअपला उडवले; दोन तरूणांचा जागीच मृत्यू, अपघातानंतर चालक पसार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 12:50 IST2025-10-13T12:49:48+5:302025-10-13T12:50:46+5:30
अपघातानंतर पसार झालेल्या हायवा चालकास सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी पाठलाग करून पकडले, गुन्हा दाखल

भरधाव हायवाने पीकअपला उडवले; दोन तरूणांचा जागीच मृत्यू, अपघातानंतर चालक पसार
सिल्लोड : भरधाव जाणाऱ्या हायवा चालकाने समोरून येणाऱ्या पिकअपला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात पिकअपमधील दोघे प्रवासी जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना सिल्लोड-भोकरदन रस्त्यावरील पिप्री फाट्यावर शनिवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली. विवेक रेवनाथ जेठे (वय २८ वर्षे, रा. टाकळी, ता. सिल्लोड) व योगेश गजानन सोनवणे (वय २८ वर्षे, रा. जळगाव सपकाळ, ता. भोकदरन) अशी मृतांची नावे आहेत. तर पवन गायकवाड (वय २७ वर्षे, रा. सराटी, ता. फुलंब्री) हा गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे पाठविण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, योगेश, विवेक व पवन हे तिघे काही साहित्य खरेदीसाठी सिल्लोडहून भोकरदनला पिकअप क्रमांक (एमएच २० इएल ५३५९)ने जात होते. सिल्लोड-भोकरदन रस्त्यावर भोकरदनकडून भरधाव येणाऱ्या हायवा क्रमांक (एमएच १७ बीवाय ०००४)च्या चालकाने भरधाव वेगात वाहन चालवून पिकअपला समोरासमोर जोराची धडक दिली. या अपघातात पिकअपचा पूर्णतः चुराडा झाला. पिकमध्ये बसलेले विवेक रेवनाथ जेठे व योगेश गजानन सोनवणे हे पिकअपमध्ये फसले होते. अपघातानंतर हायवा चालक तेथून पळून गेला होता. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीवरून सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी सिल्लोड शहराजवळ त्याला पाठलाग करून पकडले. पोलिसांनी हायवा सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात लावला आहे.
पोलिस, ग्रामस्थांनी केले मदतकार्य
या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र ठाकरे, पोलिस कर्मचारी पंडित फुले, दीपक इंगळे, दीपक पाटील तसेच ग्रामस्थ समाधान शिरसाठ, श्रीरंग गाडेकर, कृष्णा शिरसाठ यांनी अपघातग्रस्तांना पिकअपमधून बाहेर काढून तत्काळ रुग्णवाहिकेतून उपजिल्हा रुग्णालय, सिल्लोड येथे दाखल केले. तेथे डॉक्टरांनी दोघांना तपासून मृत घोषित केले. तर गंभीर जखमीला पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. या प्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी हायवा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.