धावत्या सीएनजी कारने घेतला पेट; वेळीच कुटुंब गाडीतून बाहेर पडल्याने जीवितहानी टळली
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 12:49 IST2025-03-04T12:49:19+5:302025-03-04T12:49:57+5:30
बाहेरून सीएनजी किट बसविल्याने आग लागल्याचा संशय

धावत्या सीएनजी कारने घेतला पेट; वेळीच कुटुंब गाडीतून बाहेर पडल्याने जीवितहानी टळली
छत्रपती संभाजीनगर : धावत्या सीएनजी कारला आग लागून जळून खाक झाली. आग लागत असल्याचे वेळीच लक्षात आल्याने पती, पत्नी, तीन मुलांनी क्षणात बाहेर उडी घेतल्याने मोठी दुर्घटना टळली. सोमवारी सायंकाळी रेल्वे स्थानकासमोर हा अपघात घडला.
योगेश सुरासे (रा. जय भवानीनगर) कुटुंबासह क्रांती चौकाकडून महानुभाव आश्रमाच्या दिशेने जात होते. सायंकाळी त्यांच्या टाटा टिगॉर कारच्या समोरील भागातून शिट्टीसारखा आवाज निघून धूर निघण्यास सुरुवात झाली. हे लक्षात येताच योगेश यांनी तत्काळ कुटुंबाला बाहेर काढताच क्षणात कारने पेट घेतला. कारमध्ये सीएनजी गॅसकीट असल्याने वेदांतनगरच्या निरीक्षक प्रविणा यादव, वाहतूक विभागाचे सहायक निरीक्षक विवेक जाधव, अंमलदार कचरू हापसे, संदीप प्रधान यांनी धाव घेत नागरिक, अन्य वाहनांना दूर केले. अग्निशमन विभागाचे वसीम पठाण, संदीप चव्हाण यांनी जवानांसह धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविले.
सीएनजी टाकी फुटली नाही
-अग्निशमनचे संदीप चव्हाण यांच्या माहितीनुसार, कारच्या बोनटपासून आगीस सुरुवात झाली. त्यामुळे इंजिन गरम झाल्याने किंवा सीएनजी गॅस गळती होऊनही आग लागू शकते. यात इंजिन जळून खाक झाले. आग नियंत्रणात आल्याने सीएनजी टाकी फुटली नाही.
-निरीक्षक प्रविणा यादव यांच्या माहितीनुसार, सुरासे यांची ही सेकंडहँड कार आहे. त्यांनी कारच्या मूळ सेंटिंगमध्ये बदल करून बाहेरून सीएनजी गॅसकीट बसविली होती.
काय म्हणतात तज्ज्ञ ?
स्वस्त दरामुळे सीएनजी किटकडे पाहिले जाते. मात्र, त्याच्या देखरेखीकडे दुर्लक्ष केले जाते. किटची नियमित देखरेख करावी लागते. कंपनी, शासनाने आखून दिलेले नियम पाळणारी स्टँडर्ड किट वापरावी. किट कारच्या मागे असल्यानेही ओव्हरहिटिंग होऊ शकते. बाहेरून किट बसविण्यापेक्षा कंपनीचीच किट उत्तम असते. ज्या वाहनांना शिफारस नसते, त्या कारमधेही नागरिक किट बसवितात. परिणामी, इलेक्ट्रिक सेटिंगमध्ये बदल होऊनही गॅस गळती होऊन आग लागू शकते.
- डॉ. सचिन बोरसे, विभागप्रमुख, मेकॅनिकल विभाग, देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालय.