छत्रपती संभाजीनगरजवळ गोमांसाची वाहतूक करणाऱ्या रिक्षाची तोडफोड, गोरक्षकांचा रस्तारोको
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 12:02 IST2025-12-05T12:01:09+5:302025-12-05T12:02:29+5:30
इटावा-जोगेश्वरी मुख्य रस्त्यावर गोरक्षकांनी रस्तारोको केल्याने वाळूज उद्योगनगरी ठप्प

छत्रपती संभाजीनगरजवळ गोमांसाची वाहतूक करणाऱ्या रिक्षाची तोडफोड, गोरक्षकांचा रस्तारोको
वाळूज महानगर : इटावा-जोगेश्वरी मुख्य रस्त्यावर शुक्रवारी सकाळी मोठी खळबळ उडाली. गोमांसाने भरलेली रिक्षा ( एमएच २० ईएफ ७०२३) येथून जात असल्याची माहिती काही गोरक्षकांना मिळाली. त्यांनी तत्काळ रिक्षा अडवून तपासणी केली. रिक्षामध्ये मोठ्या प्रमाणात गोमांस आढळताच वातावरण तणावपूर्ण झाले. संतप्त गोरक्षकांनी रिक्षेची तोडफोड केली आणि घटनास्थळीच रास्ता रोको आंदोलन सुरू केले.
गोरक्षकांनी स्पष्टपणे मागणी केली की, “ज्या ठिकाणी गोहत्याचे प्रकार चालतात, त्या ठिकाणांवर कठोर छापे टाकून कारवाई करावी. अवैध गोमांसाची वाहतूक उद्योगनगरी परिसरात वाढली आहे; यावर पोलिसांनी कडक पावले उचलावी.” घटनास्थळी एमआयडीसी वाळूज पोलीस दाखल झाले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू केले. मात्र गोरक्षक आपल्या मागण्यांवर ठाम असल्याने चर्चा निष्फळ ठरली. या रस्ता रोकोमुळे इटावा-जोगेश्वरी मार्ग तसेच उद्योगनगरीतील मुख्य चौकांमध्ये प्रचंड वाहतूक कोंडी झाली. उद्योगनगरीत जाणाऱ्या आणि बाहेर पडणाऱ्या वाहनांच्या रांगा लागल्याने नागरिक व कामगार त्रस्त झाले. काही वाहनधारकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्यास सुरुवात केली आहे.
तीन तासांनी रस्तारोको मागे
दरम्यान, रिक्षा चालकाने पोलिसांना दिलेल्या माहितीमध्ये म्हटले आहे की, “हे मांस आंबेलोहळ येथून आणले असून ते जोगेश्वरी येथे नेण्यासाठी निघालो होतो.” रिक्षेतून एक महिला आणि एक पुरुष यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांनी कारवाईचे आश्वासन दिल्यावर रस्ता रोको मागे घेण्यात आल्याने वाहतुक सुरळीत होण्यास सुरुवात झाली आहे.