आयुक्तालयात येत असताना पोलिस कर्मचाऱ्याचा टँकरच्या धडकेत मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2023 12:31 IST2023-07-27T12:31:01+5:302023-07-27T12:31:35+5:30
पोलीस कर्मचाऱ्याचे सहा महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न

आयुक्तालयात येत असताना पोलिस कर्मचाऱ्याचा टँकरच्या धडकेत मृत्यू
छत्रपती संभाजीनगर : शहर पोलिस दलाच्या दंगा काबू पथकात कार्यरत असलेले पोलिस अंमलदार अमोल दत्तात्रय गोरे (२८) यांचा पाण्याच्या टँकरच्या धडकेत मृत्यू झाला. बुधवारी सकाळी आठ वाजता सिल्लेगाव परिसरात हा अपघात झाला.
अमोल मूळ लासूर स्टेशन परिसरातील बोरसर येथील रहिवासी होते. पाच वर्षांपूर्वीच पोलिस दलात त्यांची निवड झाली होती. काही महिन्यांपासून ते आयुक्तालयाच्या दंगा काबू पथकात कार्यरत होते. बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे ते आयुक्तालयात येण्यासाठी गावाकडून दुचाकीवरून निघाले. लासूर स्टेशनजवळच सुसाट जाणाऱ्या पाण्याच्या टँकरने त्यांना धडक दिली. वेग अधिक असल्याने अमोल दूरवर फेकले गेले. बेशुध्दावस्थेत त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर झाल्याने नंतर शहरातील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. जवाहरनगर पोलिस ठाण्याचे अंमलदार के. के. साबळे तपास करत आहेत.
अमोल घरात मोठे हाेते. त्यांचे वडील शेतकरी असून आई, दोन लहान भाऊ आहेत. सहा महिन्यांपूर्वीच त्यांचे लग्न झाले होते. कर्तव्यात दक्ष तसेच शांत व संयमी स्वभाव असलेल्या अमोल यांच्या जाण्याने पोलिस दलात हळहळ व्यक्त करण्यात येत होती.