पतीशी नातेसंबंध नसलेल्याविरुद्ध ‘कलम ४९८’ खाली गुन्हा होऊ शकत नाही: खंडपीठ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 14:08 IST2025-02-22T14:07:31+5:302025-02-22T14:08:24+5:30
एका विवाहितेच्या तक्रारीवरून तिचा पती व त्याच्या मैत्रिणीविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.वाचा काय आहे प्रकरण

पतीशी नातेसंबंध नसलेल्याविरुद्ध ‘कलम ४९८’ खाली गुन्हा होऊ शकत नाही: खंडपीठ
छत्रपती संभाजीनगर : प्रतिवादीच्या पतीशी नातेसंबंध नसल्यामुळे याचिकाकर्तीविरुद्ध भादंवि कलम ४९८-अ अन्वये दाखल झालेल्या शारीरिक व मानसिक छळाचा प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) आणि त्यातून पुढे न्यायालयात प्रलंबित असलेली कारवाई रद्द करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या न्या. विभा कंकणवाडी आणि न्या. संजय देशमुख यांनी दिला आहे.
आरोपी पतीसोबत नातेसंबंध नसलेली व्यक्ती, इतकेच नव्हे तर पतीची मैत्रीण (गर्ल फ्रेन्ड) अथवा जिच्यासोबत पतीचे कथित अनैतिक संबंध आहेत, अशा महिलेला भादंवि कलम ४९८-अ अन्वये दाखल झालेल्या ‘विवाहितेच्या शारीरिक व मानसिक छळा’च्या गुन्ह्यात आरोपी करता येत नाही. मूळ आरोपी व याचिकाकर्ती यांचा विवाह झाल्याचा कोणताही पुरावा रेकॉर्डवर नसल्यामुळे कायद्यातील मूलभूत तत्त्वाचा उल्लेख करीत खंडपीठाने वरीलप्रमाणे आदेश दिला.
काय होती याचिका?
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शिल्लेगाव पोलिस ठाण्यात एका विवाहितेच्या तक्रारीवरून तिचा पती व त्याच्या मैत्रिणीविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. विवाहितेने फिर्यादीत म्हटले होते की, तिच्या पतीने त्याच्या मैत्रिणीबरोबर चोरून विवाह केला आहे. फिर्यादीस तिचा पती दुचाकी घेण्यासाठी माहेराहून ५० हजार रुपये आणण्यासाठी नेहमीच त्रास देत होता. या पैशासाठी पती व त्याची मैत्रीण फिर्यादीस शिवीगाळ करून मारहाणही करत होते. पैसे न दिल्यामुळे पतीने व त्याच्या मैत्रिणीने फिर्यादीला घराबाहेर काढून दिले. या तक्रारीवरून फिर्यादीचा पती व त्याची मैत्रीण यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधान कलम ४९८-अ नुसार (विवाहित महिलेवर पती किंवा नातेवाइक यांनी क्रूरता करणे) या कलमान्वये गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हा रद्द करावा म्हणून अर्जदार महिलेने ॲड. सुदर्शन साळुंके यांच्यामार्फत खंडपीठात याचिका दाखल केली होती.