वामनदादांच्या शिष्यांना गीतरूपी आदरांजली, क्रांतीगायकांची एकत्रित मैफल गाजली!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 18:32 IST2025-07-01T18:28:16+5:302025-07-01T18:32:05+5:30
‘वंदन माणसाला’ ते ‘मिळे तुपात पोळी, भीमा तुझ्यामुळे’, भीमाचे गोंधळी या क्रांतीगीतांनी साजरा झाला वामनवेलीवरील दोन फुलांचा जन्मोत्सव!

वामनदादांच्या शिष्यांना गीतरूपी आदरांजली, क्रांतीगायकांची एकत्रित मैफल गाजली!
छत्रपती संभाजीनगर: ‘ वंदन माणसाला’ या चेतन चोपडे या गायकाने गायिलेल्या गीताने सुरु झालेला ‘वामनवेलीवरील दोन फुलांचा जन्मोत्सव’उत्तरोतर रंगतच गेला. शनिवारी रात्री संत एकनाथ रंगमंदिरात ही वामनगाणी दुमदुमली. महाकवी वामनदादा कर्डक यांचे पट्टशिष्य गायक दिवंगत प्रतापसिंगदादा बोदडे आणि विजयानंद जाधव यांना गीतरुपी आदरांजली वाहण्यासाठी शहरातील नामवंत गायकांनी एकत्र येण्याचे हे दुरे वर्ष होय. यावर्षीही या उपक्रमाला भरभररुन प्रतिसाद मिळाला.
छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन करुन ही गीत मैफिल सुरु झाली. प्रा. दिलीप महालिंगे यांनी संहितेतून चळवळीतील आजच्या वास्तवावर बोट ठेवत केलेली चिरफाड हे या कार्यक्रमाचे खास वैशिष्ठ्य ठरले. अधून मधून त्यांनी ‘ मी आलो’ असं सांगत करुन दिलेला देणगीदारांचा परिचयही रंजक ठरला. यात यशवंत येरेकर, संतोष भिंगारे, विजय मगरे आदींचा समावेश होता.
मिळे तुपात पोळी, भीमा तुझ्यामुळे हे विजयनानंद जाधव लिखित गाणे प्रख्यात गायक अजय देहाडे यांनी गायले आणि त्याच्यावर बक्षीसांचा वर्षाव होत राहिला. त्यांनी गायिलेले ‘ तुफानातले दिवे’ हे वामनदादांचं गाणही हिट ठरलं. नामवंत गायक कुणाल वराळे यांनी गायिलेली ‘ भीमाचे गोंधळी’ व शाहू राजा.... असा दिलदार राजां ही दोन्ही गाणी हिट ठरली.निकिता बंड यांनी गायलेल्या ‘ भीमाची लेखणी’ व ‘ माझं माहेर आंबवडे’ या दोन्ही गाण्यांना रसिकांचा टाळ्यांचा प्रतिसाद मिळाला.
तर ‘ बरं झालं घटनाकार तू झाला’ व ‘ भीमाच्या इंग्रजीला’ ही दोन गाणी विजय पवार यांनी खुबीने गायिली. ‘ युगे येतील आणिक जातील’ व ‘जमाखर्च दाखवा’ ही दोन गाणी अक्षय जाधव यांनी गाऊन प्रशंसा मिळवली. अन्यायाची चिरा आणि ऐका भीमाचा सल्ला या सचिन भुईगळ यांनी गायलेल्या गाण्यांवर रसिकांनी ठेका धरला. भारतभूच्या मुला हे चेतन चोपटे यांनी गायिलेले गाणे हिट ठरले. दोघांच्या गावाचे या अहिर भैरवीतील समूह गीताने मैफलीचा समारोप झाला.