रानडुकरासाठी जाळे लावले, अडकला बिबट्या; पशुपालक, शेतकऱ्यांमध्ये दहशत
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 15:01 IST2025-08-20T14:59:44+5:302025-08-20T15:01:11+5:30
पैठण तालुक्यातील तोडोळी येथील घटना

रानडुकरासाठी जाळे लावले, अडकला बिबट्या; पशुपालक, शेतकऱ्यांमध्ये दहशत
बिडकीन : रानडुकरांना पकडण्यासाठी लावण्यात आलेल्या जाळ्यात रानडुकरासह एक बिबट्या अडकल्याची धक्कादायक घटना पैठण तालुक्यातील तोंडोळी परिसरात सोमवारी घडली. यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. वन विभागाने शर्थीचे प्रयत्न करून दोघांना जाळ्यातून भल्या पहाटे मुक्त केले.
पैठण तालुक्यातील तोंडोळी येथील गट नं. १११ मधील प्रल्हाद गुंजाळ यांच्या शेतात रानडुकरे पकडण्यासाठी झाडाझुडपांत कोणीतरी जाळे लावले हाेते. सोमवारी त्या जाळ्यात एक रानडुक्कर अडकलेला होता. त्याचा आवाज ऐकून बकऱ्या चारणारे आनंदा वाकडे, माया जगधने हे दोघे दुपारी साडेतीन वाजता तेथे गेले. तेव्हा त्यांना जाळ्यात एक रानडुक्कर आणि त्याच्या बाजूलाच एक बिबट्या अडकलेला दिसला. बिबट्या बघून घाबरलेल्या या दोघांनीही बकऱ्यांसह तेथून पोबारा केला.
यानंतर, त्यांनी ग्रामस्थांना जाळ्यात बिबट्या अडकल्याची माहिती मोबाइलवरून दिली. सरपंच संजय गरड यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना तत्काळ याबाबत कळविले. तत्पूर्वी बिबट्याला पाहण्यासाठी ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली होती. वन परिमंडळ अधिकारी अलका राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक प्रशांत निकाळजे, भारत पवार, चव्हाण, साळवे यांच्यासह वन विभागाचे पथक व पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. नागरगोजे तातडीने दाखल झाले.
बिबट्याला सुरक्षितरीत्या जाळ्यातून सोडवण्यासाठी व बेशुद्ध करून पकडण्यासाठी रात्री उशिरापर्यंत प्रयत्न सुरू होते. अखेर वन विभागाच्या स्ट्राइक फोर्सच्या संयुक्त कारवाईनंतर बिबट्याला सुरक्षितपणे जाळ्यातून सोडवण्यात आले. त्यानंतर गौताळा अभयारण्यात सोडण्यात आले. उपवनसंरक्षक आशा चव्हाण, प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी सागर कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली आर. टी. राठोड, सहायक वनसंरक्षक एस. डी. नागरगोजे, रेस्क्यू टीमचे एम. के. शिंगाडे, साईनाथ नरवडे, चालक अहिरे, वन कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत भाग घेतला.