माईसाहेब सविता आंबेडकरांवर येतोय चित्रपट; अनेक प्रश्नांची उत्तरे मिळणार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2022 14:08 IST2022-02-23T14:06:19+5:302022-02-23T14:08:49+5:30
मान्यवर लेखकांचे ग्रंथ आणि माईसाहेब लिखित ‘डॉ. आंबेडकरांच्या सहवासात’ या ग्रंथाचा तत्कालीन वर्तमानपत्रे, नियतकालिके, सरकारी अहवाल यांचा संदर्भ घेऊन या चित्रपटाची कथा तयार करण्यात आली आहे.

माईसाहेब सविता आंबेडकरांवर येतोय चित्रपट; अनेक प्रश्नांची उत्तरे मिळणार!
औरंगाबाद : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहचारिणी माईसाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित ‘माईसाहेब सविता आंबेडकर’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
या चित्रपटातून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर खरंच विषप्रयोग झाला होता का, या प्रश्नाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यासंदर्भात मीराताई आंबेडकर यांची मुलाखत या चित्रपटात असेल. तसेच ॲड. प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय समाजकल्याणमंत्री रामदास आठवले, गंगाधर गाडे, तसेच माईसाहेब यांचा सहवास लाभलेले विजय सुरवाडे आदींसह इतर मान्यवरांच्या मुलाखती या चित्रपटामध्ये असतील.
चां. भ. खैरमोडे, धनंजय कीर, सोहनलाल शास्त्री, नानकचंद रत्तू, तसेच माईसाहेब लिखित ‘डॉ. आंबेडकरांच्या सहवासात’ या ग्रंथाचा तत्कालीन वर्तमानपत्रे, नियतकालिके, सरकारी अहवाल यांचा संदर्भ घेऊन या चित्रपटाची कथा तयार करण्यात आली आहे. प्रकाश त्रिभुवन हे या चित्रपटाचे लेखक असून या चित्रपटासाठी डॉ. जब्बार पटेल यांचेही मार्गदर्शन घेण्यात येणार आहे. माहितीपट आणि चित्रपट या दोन्हींचा समन्वय साधून निर्मिती केली जाणार आहे. चित्रपटासाठी लवकरच तंत्रज्ञ आणि कलावंत यांची निवड केली जाणार आहे. नवे - जुने कलावंत यात भूमिका करतील.