पालखी सोहळ्याच्या एक दिवस आधी मानाचा घोडा चोरीस गेल्याने खळबळ, पैठण येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2024 17:37 IST2024-06-27T17:24:53+5:302024-06-27T17:37:23+5:30
शुक्रवारी पालखी सोहळ्यात घोडा सामील होणार आहे, एक दिवस आधीच ही घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली होती.

पालखी सोहळ्याच्या एक दिवस आधी मानाचा घोडा चोरीस गेल्याने खळबळ, पैठण येथील घटना
- अनिलकुमार मेहेत्रे
पाचोड( छत्रपती संभाजीनगर) : पैठण सरकारी दवाखान्यासमोर बांधलेला पालखी सोहळ्यातील मानाचा घोडा चोरट्यांनी पळवून नेल्याची धक्कादायक घटना बुधवारी रात्री उघडकीस आली. पैठण पोलिसांनी राबवलेल्या शोध मोहिमेमुळे हा घोडा पाचोडजवळ वडजी गावात आढळून आल्यानंतर गावकऱ्यांनी हा घोडा पैठण पोलिसांच्या ताब्यात गुरुवारी सकाळी नऊ वाजता दिला. आता उद्या, शुक्रवारी पालखी सोहळ्यात घोडा सामील होणार आहे, एक दिवस आधीच ही घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली होती.
पैठण येथून शुक्रवारी संत एकनाथ पालखी सोहळ्याचे प्रस्थान पंढरपूरकडे होणार आहे. या पालखी सोहळ्यामध्ये महेश राजेंद्र सोनवणे यांचा मानाचा घोडा सामील होतो. पैठणच्या सरकारी दवाखान्यासमोर बांधलेला हा घोडा बुधवारी रात्री चोरीस गेला. आज सकाळी सहा वाजेच्या सुमारास महेश सोनवणे हे घोड्याला वैरणपाणी करण्यासाठी गेले असता घोडा जागेवर दिसला नाही. आजूबाजूला शोध घेतला असता घोडा दिसला नाही. त्यामुळे सोनवणे यांनी लागलीच पैठण पोलीस स्टेशन गाठले.
पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी शोध मोहीम सुरू करत सोशल मिडियातून घोड्याचे फोटो व्हायरल केले. दरम्यान, पाचोडजवळ वडजी गावातील आबा गोजरे महेश झरकर किशोर गोजरे रवी भांड यांना घोडा दिसून आला. गाव परिसरात चोरटा लहान मुलांना घोड्यावरून चक्कर मारण्यासाठी दहा रुपये घेत होता.
पैठण येथीलच घोडा असल्याचे स्पष्ट होताच तरुणांनी पोलीस पाटील विठ्ठल झिने यांना माहिती दिली. त्यानंतर पैठण पोलीस स्टेशनचे निरीक्षक संजय देशमुख पथकासह सकाळी नऊ वाजेच्या सुमारास वडजी गावात दाखल झाले. मात्र, पोलिस आल्याची कुणकुण लागताच चोरटा घोडा तिथेच सोडून फरार झाला. गावकऱ्यांनी घोड्याला पकडून पैठण पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. हा मानाचा घोडा उद्या, शुक्रवारी संत एकनाथ पालखी सोहळ्यामध्ये सामील होणार आहे. एक दिवस आधी घोड्याची चोरी झाल्याने खळबळ उडाली होती. मात्र, पोलिसांनी वेगवान तपास केल्याने घोडा वेळीच आढळून आल्याने मोठी नामुष्की टळलली.