घरात खेळणाऱ्या बालकाला सर्पदंश; पित्यानेही घेतला सापाचा कडाडून चावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 16:55 IST2025-05-24T16:49:47+5:302025-05-24T16:55:01+5:30
बालकाचा दुर्दैवी मृत्यू : सोयगाव तालुक्यातील निंबायतीची घटना

घरात खेळणाऱ्या बालकाला सर्पदंश; पित्यानेही घेतला सापाचा कडाडून चावा
सोयगाव : घरात खेळणाऱ्या एका बालकाला विषारी सापाने दंश केला. हे पाहून चिडलेल्या पित्याने सदर सापाचा कडाडून चावा घेतला. यात मुलासह सापही गंभीर जखमी झाला. सदर बालकाची रुग्णालयात नेताना रस्त्यातच प्राणज्याेत मालवली. ही दुर्घटना बुधवारी दुपारी सोयगाव तालुक्यातील निंबायती येथे घडली. प्रथमेश गणेश राठोड (वय ६) असे मयत बालकाचे नाव आहे.
सध्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत असल्यामुळे साप बिळाच्या बाहेर येण्याचे प्रमाण वाढले आहे. निंबायती येथील प्रथमेश राठोड हा बालक आपल्या घरात दुपारी १ वाजेदरम्यान खेळत होता. याचवेळी त्याला घरात एका विषारी सापाने चावा घेतला. त्याच्या ओरडण्यामुळे त्याचे वडील गणेश राठोड (वय ३०) हे धावतच आले. मुलाला साप चावल्याचे पाहून त्यांनीही रागाच्या भरात सदर सापाला मधोमध कडाडून चावा घेतला. यात सापही जखमी झाला.
गंभीर जखमी अवस्थेत प्रथमेशला गणेश राठोड यांनी प्रथम सोयगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे लस उपलब्ध नसल्याने डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी रेफर केले. त्याला जळगावला नेत असताना सोयगाव- शेंदुर्णीदरम्यान प्रथमेशचा दुपारी २ वाजेदरम्यान मृत्यू झाला. प्रथमेशच्या मृतदेहावर बुधवारी रात्री ८ वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी महसूल विभागाने पंचनामा करुन राठोड कुटुंबियांना आर्थिक मदत करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.