रेकी करतानाची कार, मोपेड एकाच वेळी पोहोचल्या हॉटेलमध्ये आणि निष्पन्न झाले दरोडेखोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 14:08 IST2025-05-28T14:07:15+5:302025-05-28T14:08:22+5:30

रेकी करून जाताना खरेदीसाठी उतरला होता हाजबे, एकाच दिवसात उचलले पाच जण; ९ अधिकारी, ४० कर्मचाऱ्यांचे ११ दिवस अहोरात्र परिश्रम

A car and moped carrying out the raid arrived at the hotel at the same time and turned out to be robbers. | रेकी करतानाची कार, मोपेड एकाच वेळी पोहोचल्या हॉटेलमध्ये आणि निष्पन्न झाले दरोडेखोर

रेकी करतानाची कार, मोपेड एकाच वेळी पोहोचल्या हॉटेलमध्ये आणि निष्पन्न झाले दरोडेखोर

छत्रपती संभाजीनगर : उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरात दरोडा टाकण्यासाठी रेकी करताना योगेश हाजबेने काही महिन्यांपूर्वी खरेदी केलेली किया कार आणि एक माेपेड सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली. पोलिसांनी याचा शेवटपर्यंत माग काढला असता दोन्ही वाहने एकाच वेळी त्याच्या हॉटेलपर्यंत पोहोचल्या. तेव्हाच रेकॉर्डवरील गुन्हेगार हाजबेचे हॉटेल कळले आणि तेथेच पोलिसांना तपासाचा महत्त्वाचा धागा गवसला. शनिवार व रविवारी अवघ्या २४ तासांत नियोजन आखत पाचही जणांना अटक केली.

पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्या सूचनेवरून या गंभीर गुन्ह्याच्या तपासासाठी ९ अधिकारी ४० कर्मचाऱ्यांचे पथक नियुक्त केले होते. सुरुवातीपासून हा दरोडा माहितगाराच्या माहितीवरून रेकी करून केल्याचा संशय पोलिसांना होता. पोलिसांनी लड्डा यांच्या घरासमोरील दोन कुटुंबांचे डीव्हीआरच ताब्यात घेतले. त्यात मागील महिन्याभराचे फुटेज तपासणे सुरू केले. दुसरीकडे ९ मे पासून योगेश व अमोल खोतकरने लड्डा यांच्या सोसायटीत चकरा मारण्यास सुरूवात केली होती. पोलिसांनी काळ्या रंगाची किया व एक मोपेड दुचाकी संशयास्पदरीत्या आढळून आली. पाेलिसांनी पुढे त्यांचा माग काढणे सुरू केले.

खरेदीसाठी उतरला आणि पकडला गेला
रेकी करून जाताना एका फुटेजमध्ये हाजबे बजाजनगरमध्ये एका दुकानावर खरेदीसाठी थांबला होता. पाेलिसांना तेथेच पहिल्यांदा त्याचा चेहरा मिळाला आणि गुन्हेगार निष्पन्न झाला. पुढे पोलिस त्याची किया व मोपेडचा माग काढत गेले. तेव्हा दोन्ही गाड्या त्याच्या हॉटेलवर जाऊन थांबल्याचे आढळले. त्यानंतर पुढे गुन्ह्याची प्रत्येक कडी उकलत गेली.

पहिले हाजबेला पकडले
पोलिसांनी सर्वप्रथम हाजबे व नंतर बिडवेला ताब्यात घेतले. त्यांच्या चौकशीत आंबेजोगाईचे सोहेल व अजहरोद्दीन निष्पन्न झाले. दोन पथकांनी त्यांना घरातून अटक केली.

आंध्रप्रदेश, तामिळनाडूत प्रवास
दरोड्यानंतर १६ मे रोजी सकाळी सर्वजण लॉजवर गेले. प्राथमिक माहितीनुसार, अमोल व हाजबेने सर्वांना प्रत्येकी २०० ते २५० ग्रॅम सोने दिले. त्यानंतर सर्व विखुरले गेले. अमोल मैत्रीण हाफिजा उर्फ खुशी अक्तर अली शेख (२७, मूळ रा. पश्चिम बंगाल) हिच्यासोबत आंध्रप्रदेश, तामिळनाडूत फिरला. एन्काउंटरनंतर त्याच्या कारमध्ये पांघरुण, अंथरुण, दोघांचे कपडे, नशेच्या गोळ्या, कंडोमची पाकिटे मिळून आली.

या अधिकाऱ्यांनी घेतले परिश्रम
पोलिस निरीक्षक संदीप गुरमे, सहायक निरीक्षक रवी गच्चे, मनोज शिंदे, विनायक शेळके, काशिनाथ महांडुळे, उपनिरीक्षक विशाल बोडखे, प्रवीण पाथारकर, संदीप सोळुंके, प्रवीण वाघ, संदीप शिंदे यांच्या पथकांनी परिश्रम घेतले.

Web Title: A car and moped carrying out the raid arrived at the hotel at the same time and turned out to be robbers.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.