बिबट्याच्या हल्ल्यात बादली बनली कवच; १६ वर्षीय शेतकरीपुत्राने धाडसाने उलटवला डाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 13:11 IST2025-06-23T13:10:28+5:302025-06-23T13:11:28+5:30
डोक्यात बादली घालताच बिबट्याने ठोकली धूम

बिबट्याच्या हल्ल्यात बादली बनली कवच; १६ वर्षीय शेतकरीपुत्राने धाडसाने उलटवला डाव
कन्नड : शिकारीसाठी दबा धरून बसलेल्या एका बिबट्याच्या शावकाने (अंदाजे वय ६ महिने) एका सोळावर्षीय मुलावर झडप घातली. मात्र, सदर मुलाने प्रसंगावधान राखून बिबट्याच्या डोक्यात हातातील बादली घातल्याने गांगरलेल्या बिबट्याने तेथून धूम ठोकली. ही थरारक घटना कन्नड तालुक्यातील सासेगाव शिवारात शुक्रवारी (दि.२०) सायंकाळी घडली. ओमकार संजय घुगे, असे या धाडसी मुलाचे नाव आहे.
सासेगाव येथील ओमकार घुगे हा मुलगा शुक्रवारी सायंकाळी पाळीव जनावरांना चारापाणी करण्यासाठी शेतात गेला होता. मुरघास काढत असताना तेथे शिकारीसाठी दबा धरून बसलेल्या बिबट्याच्या अंदाजे सहा महिने वय असलेल्या शावकाने त्याच्यावर समोरून अचानक हल्ला केला. सुरुवातील घाबरलेल्या ओमकारने नंतर प्रसंगावधान राखत बिबट्याचा विरोध करीत हातात असलेल्या लोखंडी बादलीने त्याच्या डोक्यावर प्रहार केला. यामुळे गांगरलेल्या बिबट्याच्या शावकाने तेथून धूम ठोकली. हा थरार पाच ते सहा मिनिटे सुरू होता. या हल्ल्यात ओमकारच्या छातीवर व अंगावर पंजाचे ओरखडे लागल्याने तो किरकोळ जखमी झाला. सदर बिबट्याचे शावक हे पूर्णपणे वाढ झालेले नव्हते, नसता ओमकारचा जीव धोक्यात आला असता, अशी माहिती ओमकारचे पालक संजय घुगे व ग्रामस्थ राजू बोंगाने यांनी दिली.
वनविभागाचे पथक गस्तीवर
या घटनेची माहिती मिळताच आम्ही सासेगाव येथे धाव घेतली. ओमकारच्या घरी जाऊन त्याची भेट घेतली, तसेच घडलेला घटनाक्रम जाणून घेतला. सध्या ओमकार सुखरूप असून, वन कर्मचाऱ्यांचे पथक गस्तीवर आहे.
-शिवाजी टोंपे, वनपरिक्षेत्र अधिकारी, कन्नड