नो-पार्किंगमधील वाहन सोडविण्यासाठी ५०० रुपयांची लाच घेताना सहायक फौजदार अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 11:31 IST2024-12-11T11:29:44+5:302024-12-11T11:31:37+5:30
५०० रुपये लाचेची रक्कम पंचासमक्ष घेताना चव्हाण यास एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

नो-पार्किंगमधील वाहन सोडविण्यासाठी ५०० रुपयांची लाच घेताना सहायक फौजदार अटकेत
छत्रपती संभाजीनगर : शहर वाहतूक लिफ्टिंग व्हॅनने उचलून नेलेली दुचाकी सोडून देण्यासाठी ५०० रुपये लाच घेताना सहायक फौजदारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. याप्रकरणी छावणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला.
प्रदीप रामराव चव्हाण (रा. एन-१०, पोलिस कॉलनी, हडको), असे अटकेतील सहायक फौजदाराचे नाव आहे. एका तक्रारदाराची दुचाकी (एमएच २० जीएफ ५७०२) जिल्हा सत्र न्यायालयाच्या इमारतीसमोरील रस्त्यावर ९ डिसेंबर रोजी पार्क केली होती. ही दुचाकी शहर वाहतूक लिफ्टिंग व्हॅनने उचलून छावणी ग्राउंड वाहनतळ येथे नेली. ही दुचाकी सोडविण्यासाठी तक्रारदाराकडे चव्हाणने १२०० रुपये लाचेची मागणी केली.
तडजोडीअंती ७०० रुपये लाच देण्याचे ठरले. त्यातील २०० रुपयांची कायदेशीर पावती आणि ५०० रुपये लाचेची रक्कम पंचासमक्ष घेताना चव्हाण यास एसीबीच्या पथकाने पकडले. ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीप आटोळे, अपर अधीक्षक मुकुंद आघाव, उपअधीक्षक सुरेश नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक शांतीलाल चव्हाण, हवालदार रवींद्र काळे, साईनाथ तोडकर, सी. एन. बागूल यांच्या पथकाने केली.