ट्युशनहून घरी परतणाऱ्या दुचाकीवरील १५ वर्षीय मुलास भरधाव ट्रकने चिरडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2023 15:44 IST2023-02-28T15:44:21+5:302023-02-28T15:44:50+5:30
सिल्लोड शहरातून जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगर- जळगाव रस्त्यावर झाला अपघात

ट्युशनहून घरी परतणाऱ्या दुचाकीवरील १५ वर्षीय मुलास भरधाव ट्रकने चिरडले
सिल्लोड: शहरातून जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगर- जळगाव रस्त्यावर आज ( दि. २८ ) सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास एका भरधाव ट्रकने दुचाकीवरील १५ वर्षीय मुलास चिरडले. महेश कौतीक ताजने ( रा. माऊली नगर, सिल्लोड) असे मृताचे नाव आहे.
सिल्लोड शहरात महेश कौतीक ताजने हा नववीतील विद्यार्थी टिळक नगर भागात राहतो. आज सकाळी खाजगी क्लास संपल्यानंतर महेश दुचाकीवरून घरी जाण्यास निघाला होता. पेट्रोल टाकण्यासाठी जात असताना छत्रपती संभाजीनगरकडून जळगावकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या एका ट्रकने ( क्रमांक जिजे ०३ बीटी ८३१५) महेशला चिरडले.
घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक नालंदा लांडगे, पो.हे.कॉ.मनोहर सपकाळ, सांडू जाधव, पोलीस नाईक परमेश्वर शिंदे, कृष्णा खाडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात रवाना करण्यात आला. अपघातग्रस्त ट्रक व दुचाकी सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात लावली आहे. अपघातानंतर चालक ट्रक सोडून पसार झाला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.