शहरातील ९४ टक्के नागरिकांना हवेत रस्ते मोकळे; आजूबाजूला बसण्यास जागा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2020 15:16 IST2020-12-01T15:15:08+5:302020-12-01T15:16:28+5:30
. शहरातील प्रत्येक रस्त्यावर अतिक्रमणांचे साम्राज्य पसरले असून,नागरिकांना पायी चालणे सुद्धा अवघड झाले आहे.

शहरातील ९४ टक्के नागरिकांना हवेत रस्ते मोकळे; आजूबाजूला बसण्यास जागा
औरंगाबाद : स्ट्रीट्स फॉर पीपल चॅलेंजअंतर्गत महापालिकेने नागरिकांकडून रस्त्यांबद्दलच्या अपेक्षा जाणून घेतल्या. यात नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. शहरातील ९४ टक्के नागरिकांनी रस्ते मोकळे हवेत, आजूबाजूला बसण्यास छान जागा हवी. ८३ टक्के नागरिकांना मुलांसाठी रस्त्यावर सुरक्षित जागा असावी, असे वाटते.
केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटीझन मिशनने सुरू केलेल्या देशव्यापी स्ट्रीट्स फॉर पीपल चॅलेंजमध्ये औरंगाबाद महापालिकेने सहभाग घेतला आहे. या आव्हानाचा एक भाग म्हणून मनपा प्रशासक अस्तिककुमार पाण्डेय यांच्या नेतृत्वात शहरातील विविध रस्त्यांचा कायापालट करण्यात येत आहे. यात प्रामुख्याने रस्त्याच्या बाजूला दुतर्फा सुशोभीकरण, हिरवळ, चालण्यास अनुकूल फुटपाथ करण्यासाठी पावले उचलली जात आहेत. या आव्हानाला सामोरे जाण्यापूर्वी नागरिकांच्या आशा आकांक्षा, अपेक्षा जाणून घेण्याचा प्रयत्न एका सर्व्हेद्वारे केला. ऑनलाइन झालेल्या सर्व्हेमध्ये २८६ जणांनी सहभाग नोंदविला. स्ट्रीट्स फॉर पीपल चॅलेंजचे प्रमुख असलेल्या एएससीडीसीएलच्या सहायक प्रकल्प व्यवस्थापक स्नेहा मोहन नायर म्हणाल्या, या सर्व्हेतून औरंगाबादेतील नागरिक रस्त्यांचा कायापालट करण्यास इच्छुक असल्याचे स्पष्ट झाले.
पादचाऱ्यांना वाहतुकीस अडथळा आणण्यापासून रस्ते सुरक्षित करण्याची आवश्यकता नागरिकांनी व्यक्त केली. सर्वाधिक प्रतिसाद १९ ते ३५ वर्षीय युवकांद्वारे मिळाला. ३६ ते ५० वर्षे वयोगटातील नागरिक दुसऱ्या क्रमांकावर होते. सर्व्हेतील ७८ टक्के नागरिकांना घरापासून चालण्यासाठी ५ ते १० मिनिटांच्या अंतरावर मोकळी जागा हवी आहे. फुटपाथ आणि पार्किंगसाठी एक पर्याय निवडताना ७० टक्के लोकांनी फुटपाथ निवडला आणि ३० टक्के लोकांनी रस्त्यावर पार्किंगसाठी जागा हवीय. दरम्यान, या सर्व्हेत अभिप्राय नोंदवण्यासाठी नागरिकांना अजून आठवडाभराची मुदत देण्यात आली.
अतिक्रमणांना नागरिक किती वैतागले आहेत ते बघा...
शहर विकास आराखड्यानुसार प्रत्येक रस्ता कागदावर रुंद आहे. मात्र प्रत्यक्षात वस्तुस्थिती निराळी आहे. शहरातील प्रत्येक रस्त्यावर अतिक्रमणांचे साम्राज्य पसरले असून,नागरिकांना पायी चालणे सुद्धा अवघड झाले आहे. मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे पाठविण्याचे दायित्व मनपाच्या अतिक्रमण हटाव विभागाकडे आहे. हा विभाग वर्षभरात किमान दहा रस्त्यांवरील अतिक्रमणे सुद्धा काढत नाही. त्यामुळे नागरिक रस्त्यांवरील अतिक्रमणांना वैतागले आहेत.