गाझा-पॅलेस्टाईन मदतीच्या नावाने ९० लाख गोळा केले, छ. संभाजीनगरच्या डॉक्टरवर ATS चा गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 16:21 IST2025-11-14T16:17:23+5:302025-11-14T16:21:02+5:30
किराडपुऱ्यातील युनानी डॉक्टरचा धक्कादायक प्रकार : १०.२४ लाखांचे १४ व्यवहार परदेशात

गाझा-पॅलेस्टाईन मदतीच्या नावाने ९० लाख गोळा केले, छ. संभाजीनगरच्या डॉक्टरवर ATS चा गुन्हा
छत्रपती संभाजीनगर : पॅलेस्टाईन, गाझामधील मदत कार्याला पाठिंबा देण्याचा दावा करून इमाम अहेमद रजा फाउंडेशन या अनधिकृत संस्थेच्या माध्यमातून एका युनानी डॉक्टरने शहरातील अनेकांकडून तब्बल ९० लाख रुपये निधी गोळा केला. यापैकी १० लाख २४ हजार रुपये एका विदेशी संकेतस्थळावरून विदेशात पाठवल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. सय्यद बाबर अली सय्यद महेमूद (रा. बदाम गल्ली, किराडपुरा) असे संशयिताचे नाव असून, एटीएसच्या तपासात ही बाब निष्पन्न झाली. तूर्तास त्याच्यावर एटीएसने सिटी चौक पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, बाबरने युनानी वैद्यकशास्त्रातील डिप्लोमा केला आहे.
एटीएसकडून गेल्या काही दिवसांपासून विविध स्वयंसेवी संस्थांची माहिती तपासली जात होती. यात इमाज अहेमद रजा फाउंडेशन ही संस्था फिलिस्तीन व गाझामधील युद्धाने प्रभावित झालेल्या नागरिकांसाठी सोशल मीडियावर क्युआर कोड पाठवून निधी गोळा करत असल्याचे एटीएसला समजले. तपास अधिकाऱ्यांनी धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे या संंस्थेची माहिती मागवली. त्यात ही संस्थाच नोंदणीकृत नसल्याचे समजले. या संस्थेचा चालक व संशयित आरोपी सय्यद बाबर हा रजा एम्पॉवरमेंट फाउंडेशन नावाने संस्था चालवतो. ही मुंबई येथे नोंदणीकृत आहे. मात्र, या संस्थेला विदेशी नागरिकांसाठी निधी गोळा करण्याचे अधिकार नाहीत. मात्र, तरीही बाबरने यू ट्यूब व अन्य सोशल मीडियाद्वारे अशा प्रकारे निधी गोळा करण्यासाठीचे व्हिडीओ टाकण्यास सुरुवात केली.
स्वत:च्या खात्यात रक्कम
बाबरने निधीच्या नावाखाली स्वत:च्याच बँक खात्याचा स्कॅन कोड व्हायरल केला. ४ जुलै २०२४ ते ६ ऑक्टोबर २०२५ दरम्यान त्याच्या खात्यात ९० लाख ९९ हजार ८९३ रुपये रक्कम जमा झाली. एटीएसने फिर्यादी होत सिटी चौक पोलिस ठाण्यात बाबरवर गुन्हा दाखल केला. त्याला नोटीस देऊन सोडण्यात आले. आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक संभाजी पवार यांच्याकडे तपास सुपुर्द करण्यात आला.
दहा लाख दिले कोणाला ?
मिळालेल्या रकमेपैकी बाबरने १० लाख २४ हजार रुपये gofundme.com या संकेतस्थळावर पाठवले. हे संंकेतस्थळ विदेशी आहे. मात्र, ते गाझा पट्टीसाठीच निधी गोळा करते की अन्य बाबींसाठी, याचा एटीएस व अन्य तपास यंत्रणा तपास करत आहेत. दिल्ली स्फोटांचा तपासादरम्यान देशभरातील बेनामी विदेशी व्यवहारांचा तपास सुरू आहे. त्यातच शहरातून गाझाच्या नावाखाली आर्थिक व्यवहार झाल्याने केंद्रीय तपास यंत्रणाही हादरून गेल्या. एटीएसने याबाबतची कागदपत्रे त्यांना दिल्याचे सूत्रांनी सांगितले. बाबर कोणाच्या संपर्कात होता, त्याने कुठे प्रवास केला, याची माहिती तपासली जात आहे.