सासू-सुनेच्या वादाचा भीषण शेवट! सून रक्तबंबाळ पाहून ७६ वर्षीय वृद्धेचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 13:06 IST2026-02-04T13:01:36+5:302026-02-04T13:06:02+5:30
छत्रपती संभाजीनगर हादरले! किरकोळ वाद सासूच्या जिवावर बेतला, सून आयसीयूमध्ये

सासू-सुनेच्या वादाचा भीषण शेवट! सून रक्तबंबाळ पाहून ७६ वर्षीय वृद्धेचा जागीच मृत्यू
छत्रपती संभाजीनगर : सासू-सुनेमध्ये कौटुंबिक कारणातून वाद उफाळले. संतापून सुनेने स्वत:च्या हाताची नस कापून घेतली. त्यामुळे मोठा रक्तस्त्राव झाला. आरडाओरड ऐकून शेजाऱ्यांनी धाव घेतली. मात्र, शेजाऱ्यांची धाव व रक्तबंबाळ सुनेला पाहून ७६ वर्षीय सासूला जोराचा धक्का बसून ती क्षणात मृत्युमुखी पडली. मंगळवारी सकाळी या धक्कादायक घटनेने बीड बायपास परिसर हादरला.
घराघरात सासू-सुनेचे वाद नवे नाहीत. किरकोळ कारणांवरून खटके उडतात, अबोला धरला जातो आणि काही वेळाने पुन्हा सगळे पूर्ववत होते. मात्र, बीड बायपास परिसरात वाद सासूच्या जिवावर बेतला. पोलिसांच्या माहितीनुसार, बीड बायपास परिसरात राहणारे कृष्णा (नाव बदलले आहे) कंपनीत नोकरीला आहेत. मंगळवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे कामावर गेले. त्यांची दोन मुलेही शाळेत गेली. यानंतर काही वेळात घरात ४२ वर्षीय सून व ७६ वर्षीय सासूत वाद झाले. सुनेला राग अनावर झाला. संतापाच्या भरात तिने टोकाचे पाऊल उचलत डाव्या हाताची नस कापून घेतली. त्यामुळे मोठा रक्तस्त्राव होऊन ती बेशुद्ध पडली. यामुळे घरातून आरडाओरड ऐकू आल्याने शेजाऱ्यांनी धाव घेतली. मात्र, अचानक झालेली गर्दी, समोर रक्तबंबाळ अवस्थेत पडलेल्या सुनेला पाहून ७६ वर्षीय सासूला जबर धक्का बसला आणि त्या क्षणातच जमिनीवर कोसळल्या.
दाेघींना रुग्णालयात दाखल केले
शेजाऱ्यांनी तातडीने मदत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, वृद्धेला शुद्ध आली नाही. काहींनी त्यांना घाटी रुग्णालयात नेले. तर सुनेला एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, तोपर्यंत सासूचा मृत्यू झाला होता. दुसरीकडे ब्लेडचा वार खोलवर गेल्याने सुनेची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनेची माहिती कळताच साताऱ्याचे सहायक पोलिस निरीक्षक शैलेश देशमुख यांनी घाटी रुग्णालयात धाव घेतली.
मानसिक धक्क्यामुळे मृत्यू
सुरुवातीला घाटी रुग्णालयात ७६ वर्षीय वृद्धेला दाखल करताना मारहाण हे कारण नमूद करण्यात आले होते. त्यामुळे पोलिसांनी शवविच्छेदनाबाबत डॉक्टरांशी चर्चा केली. सायंकाळी अहवालात वृद्धेचा मृत्यू ‘डेथ ड्यू टू शॉक' असल्याचे निष्पन्न झाल्याचे सूत्रांनी सांगितले.