अनुदान लाटून शेडनेट न उभारणाऱ्या ७० शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यांवर ६ कोटी ३० लाखांचा बोजा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 12:45 IST2025-08-04T12:38:57+5:302025-08-04T12:45:01+5:30
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ७० शेतकऱ्यांनी अनुदान पदरात पडल्यानंतर शेडनेट गायब केल्याचे कृषी विभागाच्या पडताळणीत आढळून आले होते.

अनुदान लाटून शेडनेट न उभारणाऱ्या ७० शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यांवर ६ कोटी ३० लाखांचा बोजा
छत्रपती संभाजीनगर : शासनाकडून अनुदान लाटून शेडनेट न उभारणाऱ्या जिल्ह्यातील ७० शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यांवर तब्बल ६ कोटी ३० लाख रुपयांचा बोजा टाकण्यात आला आहे. ही कार्यवाही व्हावी, यासाठी कृषी विभागाला महसूल विभागाकडे सतत पाठपुरावा करावा लागल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेचा (पोकरा) पहिला टप्पा वर्ष २०१८ ते २०२४ या कालावधीत राबविण्यात आला. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांसाठी शेडनेटची योजना होती. या योजनेच्या लाभार्थ्यांना शेडनेटच्या आकारानुसार १२ ते १७ लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्यात आले होते. या योजनेच्या लाभार्थ्यांनी लाभ घेतल्यापासून पुढील ५ वर्षे त्यांच्या शेतात शेडनेट ठेवणे बंधनकारक होते. मात्र जिल्ह्यातील ७० शेतकऱ्यांनी अनुदान पदरात पडल्यानंतर शेडनेट गायब केल्याचे कृषी विभागाच्या पडताळणीत आढळून आले होते. याप्रकरणी कृषी विभागाने या लाभार्थी शेतकऱ्यांना नोटिसा पाठवून अनुदानाची रक्कम परत करण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र शेतकऱ्यांनी या नोटिसांना केराची टोपली दाखविली.
अखेरीस कृषी विभागाने, जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर अनुदानित रकमेचा बोजा चढविण्याचे प्रस्ताव तहसीलदारांना देण्यात आले. शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यांवर बोजा टाकू नये, यासाठी काही लोकप्रतिनिधींनी कृषी अधिकाऱ्यांवर दबावही आणला होता. मात्र, या दबावाला न जुमानता जिल्ह्यातील ७० लाभार्थी शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यांवर एकूण ६ कोटी ३० लाख रुपयांचा बोजा चढविण्यात आल्याची माहिती कृषी विभागाने दिली.