'अनुदाना'साठी ६० विद्यार्थ्यांची ऑनलाइन 'चोरी'; हडकोतील शाळेने पळविले फुलंब्रीतील विद्यार्थी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 16:40 IST2025-11-15T16:36:05+5:302025-11-15T16:40:52+5:30
शिक्षण क्षेत्रातील नीतिमत्तेवर प्रश्नचिन्ह; संस्थापकासह दोन मुख्याध्यापकांवर गुन्हा!

'अनुदाना'साठी ६० विद्यार्थ्यांची ऑनलाइन 'चोरी'; हडकोतील शाळेने पळविले फुलंब्रीतील विद्यार्थी!
फुलंब्री :छत्रपती संभाजीनगरातील हडको येथील जयलक्ष्मी विद्यालयाने फुलंब्रीतील ओॲसिस इंग्रजी शाळेचे चक्क ६० विद्यार्थी ऑनलाइन पद्धतीने पळविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हे विद्यार्थी आपल्या शाळेच्या पटावरही दर्शवले. ही बाब उघड झाल्यानंतर या प्रकरणी जयलक्ष्मी पी.एस. विद्यालयाच्या संस्थापकासह दोन मुख्याध्यापकांवर फुलंब्री ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुख्याध्यापिका करुणा दांडगे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, फुलंब्री शहरातील मानमोडी शिवारात न्यू ओयसिस इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज आहे. या शाळेचा यूजर आयडी आणि पासवर्ड मिळवून तेथील तब्बल ६० विद्यार्थी छत्रपती संभाजीनगर शहरातील हडको येथे असलेल्या जयलक्ष्मी पी.एस. विद्यालयात ऑनलाइन पद्धतीने वळविण्यात आले. हा प्रकार २८ सप्टेंबर रात्री १० ते २९ सप्टेंबर मध्यरात्री एक वाजेदरम्यान करण्यात आला. ओॲसिस स्कूल प्रशासनाने ऑनलाइन विद्यार्थी तपासले असता आपले विद्यार्थी दुसऱ्याच शाळेत ट्रान्स्फर झाल्याचे लक्षात आले. यानंतर मुख्याध्यापिका दांडगे यांनी पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणी शुक्रवारी (दि. १४) सायंकाळी साडेसहा वाजता फुलंब्री ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
जयलक्ष्मी पी. एस. विद्यालयाचे संस्थापक गणेश काळे, मुख्याध्यापक सूर्यवंशी आणि उपासे यांनी संगनमत करून स्वतःच्या फायद्यासाठी विद्यार्थ्यांची नावे आपल्या शाळेच्या अभिलेखांवर ऑनलाइन पद्धतीने वळवून फसवणूक केल्याचा आरोप आहे. या तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस निरीक्षक संजय सहाणे यांच्या मार्गदर्शनात जमादार सुनील सोनवणे पुढील तपास करीत आहेत.
तुकडीच्या मंजुरीसाठी उपद्व्याप?
विद्यार्थिसंख्येनुसार मिळणारे अनुदान लाटण्यासह वाढीव पटसंख्या दर्शवून नवीन तुकडी आणि शिक्षकांच्या पदांना मंजुरी मिळवण्यासाठी जयलक्ष्मी विद्यालयाने हा उपद्व्याप केला असावा, अशी चर्चा आहे. दरम्यान, ओॲसिस शाळेचा यूजर आयडी व पासवर्ड कसा मिळवला, विद्यार्थी का ट्रान्स्फर केले, याचा तपास पोलिस करत आहेत.