लातुरात महापालिकेचे ६ फिरते शौचालय !
By Admin | Updated: September 10, 2014 00:47 IST2014-09-10T00:35:38+5:302014-09-10T00:47:58+5:30
लातूर : लातूर शहर महागनरपालिका कार्यक्षेत्रात गेल्या अनेक दिवसांपासून सार्वजनिक शौचालयांचा अभाव आहे़ सर्वाधिक वर्दळ असलेल्या बाजारपेठेतील ठिकाणे, प्रमुख चौकांत

लातुरात महापालिकेचे ६ फिरते शौचालय !
लातूर : लातूर शहर महागनरपालिका कार्यक्षेत्रात गेल्या अनेक दिवसांपासून सार्वजनिक शौचालयांचा अभाव आहे़ सर्वाधिक वर्दळ असलेल्या बाजारपेठेतील ठिकाणे, प्रमुख चौकांत शौचालय उभारण्याची मागणी आहे़ परंतू, मनपा प्रशासनाला प्रमुख ठिकाणी जागा मिळत नसल्याने हे काम रखडले असतानाच ६ फिरत्या सार्वजनिक शौचालयासाठी सोमवारी स्थायी समितीच्या बैठकीत आलेल्या निविदेला नेहमीप्रमाणे मंजुरी दिली आहे़ विशेष म्हणजे ज्या कंत्राटदाराची निविदा मंजूर करण्यात आली तो कंत्राटदार काळ्या यादीत असल्याचा आरोपही बैठकीत करण्यात आला़
स्थायी समितीने गेल्या पंधरा दिवसांत विविध कामांसाठी आलेल्या निविदांना तात्काळ मंजुरी देत कार्यारंभाचे आदेश दिले आहेत़ घाई-घाईत होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकींचा अजेंडाही अचानकपणे आणला जात आहे़ सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजनेंतर्गत मुलभूत सेवा व सुविधा या घटकांतर्गत लातूर शहरात ६ फिरते खरदी करण्यासाठी ३१ लाख ५० हजार रूपयांच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली होती़ त्यानुसार शौलचाय खरेदीची निविदा आॅनलाईन मागविण्यात आल्या होत्या़ त्यात नाशिक येथील एस़एस़एन्टरप्रायझेसने प्रति नग ५ लाख २ हजार २००, साई इंडस्ट्रिज ६ लाख ४६ हजार व मिरज येथील न्यू साई फायबर यांनी ८ लाख ८२ हजाराप्रमाणे निविदा भरली होती़ कमी दरात असलेली एस़एस़एन्टरप्रायझेस यांच्या निविदेला मंजुरी देण्यासाठी स्थायी बैठकीत आयुक्तांनी प्रस्ताव दिला़ दर कमी असल्याने ६ नग खरेदीत मनपाचे जवळपास ८ लाख ६२ हजार ८०० रूपये वाचणार असल्याने स्थायी समितीने नाशिकच्या एस़एस़एन्टरप्रायझेस कंपनीची निविदा मंजूर केली़ सभापती अख्तर मिस्त्री, आयुक्त सुधाकर तेलंग यांच्यासह सदस्य, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते़
काळ्या यादीतला कंत्राटदाऱ़़़
ज्या कंत्राटराच्या निविदेला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे, तो कंत्राटदार तुळजापूर नगरपालिकेने काळ्या यादीत टाकला असल्याचे पत्र मनपाला मिळाले होते़ काळ्या यादीत नाव असलेल्या कंत्राटदाराची निविदा मंजूर कशी करता, असा सवाल शिवसेनेचे रवी सुडे बैठकीत केला़ त्यावर आयुक्तांनी संबंधित कंत्राटदाराची चौकशी करण्यात आली़
तुळजापूर पालिकेने तसा ठराव मांडला होता परंतू त्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकले नसल्याचे चौकशीत उघड झाल्याचे स्पष्टीकरण दिले़ मात्र, त्यांच्या कामाचा दर्जा योग्य आढळला नाही़ ही वस्तुस्थिती लक्षा घेता त्यांच्याकडून प्रति नग १० टक्के सुरक्षा अनामतीऐवजी २५ टक्के भरून घेतल्यावर पुरवठा आदेश देण्यात येईल, असे सांगितले़
प्रारंभी १ शौचालय खरेदी करण्यात यावे़ त्याचा दर्जा चांगला आढळून आल्यास इतर ५ नग मागविण्यात यावेत, असे शैलेश स्वामी यांनी सांगितले़ खरेदी करण्यात आलेल्या शौचालयाचा दर्जा शासकीय तंत्रनिकेतन, लातूर यांच्याकडून तपासून घेण्यात येणार असल्याचा खुलासा प्रशानाने केला़ सहापैकी २ शौचालय महिलांसाठी व ४ पुरूषांसाठी ठेवावेत अशा सूचना डॉ़ रूपाली सोळुंके यांनी मांडल्या़ फिरत्या शौचालयासाठी ३१ लाख ५० हजार रूपयांच्या प्रस्तावास १ मार्च २०१४ रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली होती़ तब्बल पाच महिन्यानंतर मनपा प्रशासनाने निविदा काढून स्थायी समितीच्या बैठकीत निविदेला मंजुरी मिळवून घेतली आहे़