पडेगाव-मिटमिट्यात ५८५ टोलेजंग अतिक्रमणांवर हातोडा; मनपा, पोलिस रस्त्यावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 19:15 IST2025-07-04T19:15:13+5:302025-07-04T19:15:36+5:30
आक्रोश, विराेध, आरोप, अस्वस्थता आणि इमारतींचा धुराळा, मलबा असे चित्र पाडापाडी कारवाईप्रसंगी ७.५ कि.मी. अंतरात होते.

पडेगाव-मिटमिट्यात ५८५ टोलेजंग अतिक्रमणांवर हातोडा; मनपा, पोलिस रस्त्यावर
छत्रपती संभाजीनगर : शहरातून नगरनाका, छावणी मार्गे पडेगाव व मिटमिटा या भागातून जाणाऱ्या मुंबई हायवेवरील टोलेजंग अतिक्रमित इमारतींवर महापालिकेने गुरूवारी सकाळपासून कारवाईचा हातोडा चालविला. यावेळी तगडा पोलिस बंदोबस्त होता. कारवाईच्या पहिल्या दिवशी मिटमिटा शाळेपर्यंतची ५८५ अतिक्रमणे पाडण्यात आली. यात टोलेजंग इमारती, पक्की आणि कच्ची बांधकामे, हॅाटेल, लॅाज, दुकाने, शेड, कम्पाउंड, ओटे, गॅरेज, वॅाशिंग सेंटर, कमान, जाहिरात फलकांचा समावेश आहे.
आक्रोश, विराेध, आरोप, अस्वस्थता आणि इमारतींचा धुराळा, मलबा असे चित्र पाडापाडी कारवाईप्रसंगी ७.५ कि.मी. अंतरात होते. या मोहिमेमुळे दररोज वाहतूक कोंडीत अडकणाऱ्या नागरिकांनी तसेच, त्या भागात राहणाऱ्या सुमारे २० वसाहतींतील सामान्य नागरिकांनी समाधान व्यक्त केले. रस्ता रुंदीकरण आणि मोजणीचे अंतर यातून अतिक्रमित मालमत्ताधारकांचे आणि पालिकेच्या पथकाचे खटके उडाले. तसेच काही मालमत्ताधारकांना स्वत:हून अतिक्रमण पाडण्यास मुभा दिली. काही ठिकाणी विनंती करूनही मनपाच्या पथकाने वेळ न दिल्याचा आरोप झाला. यातून तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले हाेते. नगरनाका ते शरणापूर फाट्यापर्यंत सर्वत्र अतिक्रमण हटाव कारवाईचे चित्र होते. रस्त्याची पूर्ण पाहणी करून आढावा घेतला असता अनेकांनी स्वत:हून अतिक्रमण काढण्यास सुरुवात केल्याच दिसले. आज पहिल्या दिवशीच्या कारवाईनंतर, शुक्रवारी पुन्हा त्याच भागात पालिकेचे पथक कारवाईसाठी धडकणार आहे. दरम्यान, कारवाईमुळे अनेक नागरिकांच्या डोळ्यात अश्रू तरळत होेते. कारवाई करू नका, अशी आर्जव ते पालिकेकडे करताना दिसले.
प्रशासक जी. श्रीकांत यांच्या आदेशाने केलेल्या कारवाईत अतिरिक्त आयुक्त संतोष वाहुळे, नगररचना विभागाचे उपसंचालक गर्जे, अभियंता अमोल कुलकर्णी, सहायक पोलिस आयुक्त रणजित पाटील, मनपा उपायुक्त सविता सोनवणे, सहायक आयुक्त अर्जुन गिराम, प्राजक्ता वंजारी, अर्चना राजपूत, रमेश मोरे, संजय सुरडकर, समीउल्लाह, भारत बिरारे, राहुल जाधव, नईम अन्सारी, इमारत निरीक्षक कुणाल भोसले, शिवम घोडके, सागर श्रेष्ठ, तृप्ती जाधव, सौरभ साळवे, सूरज संवडकर, शिवाजी लोखंडे, प्रमोद जाधव सहभागी होते.
मार्किंगवरून नाराजी
छावणी हद्दीत पूर्ण रस्ता १० मीटर म्हणजेच ३० फुट रुंदीचा असेल, तर उर्वरित ७.५ कि.मी. रस्ता हा दुभाजकासह ६० फुटांचा असेल. दोन्ही बाजूंनी ५ मीटरचा सर्व्हिस रोड असणार आहे. त्यासाठी मध्यवर्ती केंद्रबिंदू ठरवून मनपाच्या पथकाने दुतर्फा मार्किंग केल्यावर पाडापाडीसाठी बुलडोझर सरसावले. गुगल मॅपिंगवरील मोजणी वेगळी, विकास आराखड्यातील रेखांकनाची मोजणी वेगळी, तर ऑन दी स्पॉट केलेली मोजणी वेगळी असल्याचे अनेक ठिकाणी समोर आल्याने नागरिकांनी मनपा पथकासोबत हुज्जत घातली. यातून सायंकाळी मिटमिटा येथे वाद होऊन प्रकरण पाेलिसांत गेले.
अनेकांना वेळ दिल्याने आरोप
त्या रस्त्यावर सर्वाधिक हॉटेल्स आहेत. नियमांत बांधकाम केलेल्या मोजक्याच इमारती आढळून आल्या. काही अतिक्रमणधारकांना व्हीआयपी ट्रीटमेंट दिली. तर काही नागरिकांनी स्वत:अतिक्रमण काढण्याची विनंती केली तरी त्यांना मनपाने दाद दिली नाही. यातून नागरिक, पोलिस, मनपा पथकात अनेक ठिकाणी हुज्जत घालणारे चित्र होते. अतिक्रमण मोहिमेचे प्रमुख अतिरिक्त आयुक्त संतोष वाहुळे यांनी सांगितले की, कुणालाही व्हीआयपी ट्रीटमेंट देण्याचा प्रश्न येत नाही. शुक्रवारी सकाळी त्या भागात कारवाई पुन्हा सुरू होईल.
पहिल्या दिवशी किती अतिक्रमणे पाडले?
५८५ पक्की आणि कच्ची बांधकामे ज्यामध्ये हॅाटेल, लॅाज, दुकाने, शेड, कम्पाउड, ओटे, गॅरेज, वॅाशिंग सेंटर, कमान, जाहिरात फलक पाडण्यात आले.
मनपाची टीम किती?
३५० अधिकारी, कर्मचारी
पोलिस कुमक किती?
२५० अधिकारी व कर्मचारी
यांत्रिकी ताफा किती?
३० जेसीबी, ८ पोकलॅन, १५ टिप्पर, २ रुग्णवाहिका, २ कोंडवाडा वाहने, २ अग्निशमन बंब ,५ इलेक्ट्रिक हायड्रॉलिक वाहने.