५७३७ विद्यार्थ्यांची संचमान्यता धोक्यात; शाळांना बसणार फटका, शिक्षकांची पदे अतिरिक्त?
By राम शिनगारे | Updated: September 25, 2025 12:15 IST2025-09-25T12:14:01+5:302025-09-25T12:15:12+5:30
अपडेट माहिती तपासणीसाठी संचालक कार्यालयाकडे वर्ग

५७३७ विद्यार्थ्यांची संचमान्यता धोक्यात; शाळांना बसणार फटका, शिक्षकांची पदे अतिरिक्त?
छत्रपती संभाजीनगर : शालेय शिक्षण विभागाने ३० सप्टेंबर रोजीच्या व्हॅलिड आधारच्या संख्येवर संचमान्यता करण्यात येणार आहे. मात्र, त्यापूर्वीच ५ हजार ७३७ विद्यार्थ्यांच्या आधारमध्ये अपडेट केले आहे. हे अपडेट तपासण्यासाठी पुण्यातील शिक्षण संचालक कार्यालयाकडे पाठविले आहे. ३० सप्टेंबरपूर्वी विद्यार्थ्यांचे आधारची माहिती तपासून आली नाही तर शाळेतील ५ हजार ७३७ विद्यार्थी संचमान्यतेत दिसणार नाहीत. त्याचा फटका शेकडो शाळांना बसून, शिक्षकांची पदे अतिरिक्त ठरण्याचा धोका निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे.
शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाल्यानंतर संचमान्यतेचा विषय चर्चेत आला आहे. शालेय शिक्षण संचालक कार्यालयाने सुरुवातीलाच जुलै अखेरची तारीख संचमान्यतेसाठी गृहीत धरण्याचा निर्णय घेतला होता. त्या निर्णयास विविध शिक्षक संस्थाचालक, लोकप्रतिनिधी आणि संघटनांनी टोकाचा विरोध केला. त्यामुळे शिक्षण विभागाला माघार घ्यावी लागली. सुधारित नियमानुसार ३० सप्टेंबर रोजीच्या उपस्थितीवरच संचमान्यतेचा निर्णय जाहीर झाला. त्यासाठी अवघे पाच दिवसच उरले असल्यामुळे शिक्षकांसह संस्थाचालकांमध्ये संचमान्यतेची गडबड सुरू आहे. त्यातच राज्यभरात बाल आधार अपडेट केलेले नसल्यामुळे हजारो विद्यार्थ्यांच्या वैध असलेले आधार व्हॅलिड होत नाहीत. त्याचा थेट परिणाम संचमान्यता तयार करताना होणार असल्याचे समोर आले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शाळांनी आधार कॅम्पचे आयोजन करत बाल विद्यार्थ्यांचे आधार अपडेट करुन शालार्थ प्रणालीत माहिती भरली आहे. ही माहिती तपासणीसाठी पुण्यातील संचालक कार्यालयाकडे गेली आहे. त्या ठिकाणी येत्या पाच दिवसांत तपासणी झाली नाही तर संबंधित विद्यार्थी संचमान्यतेत येणार नाहीत. परिणामी जिल्ह्यातील अनेक शाळांमधील पदे रिक्त होणार असल्याचे समोर येत आहे.
तांत्रिक अडचणीत अडकलेले विद्यार्थी
तालुका............................विद्यार्थी संख्या
छ. संभाजीनगर शहर.........२०४५
छ. संभाजीनगर तालुका .......३४०
गंगापूर................................५८२
कन्नड.................................९३६
खुलताबाद.........................६८३
पैठण..................................३२९
सिल्लोड.............................३२४
सोयगाव..............................२५२
फुलंब्री................................२२८
वैजापूर................................१८
एकूण...................................५७३७
आधारची माहिती तपासण्यासाठी पाठवली
पुण्यातील संचालक कार्यालयाकडे आधारची माहिती तपासण्यासाठी पाठविलेली आहे. तेथील प्रक्रियेला विलंब होऊ शकतो. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच जिल्हा व तालुकानिहाय असा टॅब उपलब्ध करून तपासणीचे काम जिल्हा पातळीवरच पूर्ण करावे.
-प्रदीप विखे, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी शिक्षक संघ