भर पावसात छत्रपती संभाजीनगरातील जळगाव रोडवर ४४५ मालमत्ता जमीनदोस्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 15:52 IST2025-07-09T15:50:58+5:302025-07-09T15:52:16+5:30
निवासी मालमत्तांना १५ ऑगस्टपर्यंतची मुदत

भर पावसात छत्रपती संभाजीनगरातील जळगाव रोडवर ४४५ मालमत्ता जमीनदोस्त
छत्रपती संभाजीनगर : जळगाव रोड २०० फूट रुंद करण्यासाठी मंगळवारी महापालिकेने ४४५ अनधिकृत मालमत्तांवर कारवाई केली. मयूर पार्क भागात एका हॉटेल व्यावसायिकाने विरोध केला. आंबेडकरनगरात कारवाईपूर्वी थोडासा तणाव निर्माण झाला होता. मात्र, विरोध झुगारून महापालिकेने कारवाई पूर्ण केली. विशेष बाब म्हणजे सकाळी पाऊस सुरू असतानाही कारवाई थांबली नाही.
महापालिकेने दोन दिवस अगोदरच जळगाव रोडवर सर्व्हिस रोड तयार करण्यासाठी कारवाई करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे बहुतांश मालमत्ताधारकांनी संभाव्य नुकसान टाळण्यासाठी सामान आणि अनधिकृत बांधकाम काढून घेतले होते. हर्सूल टी पॉइंटपासून कारवाईला सुरुवात केली. मयूर पार्क भागात पथक आल्यानंतर एका हॉटेल विक्रेत्याने कडाडून विरोध दर्शविला. पोलिस आणि मनपाच्या माजी सैनिकांनी त्याला बाजूला घेत कारवाई पूर्ण केली. हॉटेल मालकावर हर्सूल ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. एसबीओ शाळेसमोर छोट्या-मोठ्या मालमत्तांवर जेसीबीने कारवाई केली. जाधववाडी सिग्नलपर्यंत किरकोळ स्वरूपात कारवाई केली. पुढे एका खाजगी मालमत्ताधारकाने जमिनीवर पत्रे लावले होते. त्यांचा विरोध झुगारून पत्रे काढण्यात आले.
कलावती लॉनच्या बाजूला मोठी तीन मजली इमारत ३० मीटर रस्त्यात बाधित होत होती. दोन मोठे पोकलेन लावून या इमारतीचा जिना, दर्शनी भाग दोन तासांच्या मेहनतीनंतर जमीनदोस्त केला. रेणुका माता मंदिरासमोर बऱ्याच व्यावसायिक मालमत्ता होत्या. त्यासुद्धा पाडण्यात आल्या. निवासी मालमत्तांना हात लावला नाही.
दोन मजली इमारतीचे निकृष्ट बांधकाम
रेणुका माता मंदिरासमोर १२०० चौरस फुटांवर दोन मजली व्यावसायिक इमारत बांधली होती. इमारतीचे कॉलम आणि भिंती उभ्या होत्या. मात्र, त्याचा वापर होत नव्हता. संपूर्ण इमारत ३० मीटरमध्ये बाधित होत होती. मनपाने जेसीबी लावताच पहिला कॉलम पत्त्यासारखा कोसळला. भिंतीवर जेसीबीचे फावडे मारताच इमारत कोसळत होती. इमारतीचा स्लॅब पाडला, त्यात नाममात्र लोखंड, सिमेंटचा अत्यल्प वापर दिसून आला. या इमारतीचा सांगडा वर्षभरात आपोआप पडला असता. हे दृश्य पाहून उपस्थित जमाव आणि मनपा अधिकारीही आश्चर्यचकीत झाले.