कुपोषित ३०५ चिमुकले ठणठणीत
By Admin | Updated: June 13, 2014 00:37 IST2014-06-13T00:17:30+5:302014-06-13T00:37:12+5:30
विठ्ठल फुलारी , भोकर राजमाता जिजाऊ आरोग्य व पोषण अभियान अंतर्गत राबविण्यात आलेल्या अभियानात भोकर एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयाला चांगलेच यश आले आहे़

कुपोषित ३०५ चिमुकले ठणठणीत
विठ्ठल फुलारी , भोकर
राजमाता जिजाऊ आरोग्य व पोषण अभियान अंतर्गत राबविण्यात आलेल्या अभियानात भोकर एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयाला चांगलेच यश आले आहे़ या अभियानात ३०५ कुपोषित चिमुकल्यांना सर्वसाधारण श्रेणीत आणत हे चिमुकले ठणठणीत झाले आहेत़
भोकर तालुक्यातील ११ हजार ४३२ बालके अंगणवाडीच्या संपर्कात आहेत़ यांना पोषण आहार देण्यातही येतो़ राजमाता जिजाऊ आरोग्य व पोषण अभियान राबविण्याच्या १४ नोव्हेंबर २०१३ पूर्वी तालुक्यात कमी वजन असलेले ६५३ तर तीव्र कमी वजन असलेले १४६ बालके होती़ ७ एप्रिलपर्यंत राबविण्यात आलेल्या या अभियानात अंगणवाडी कार्यकर्ती, मदतनीस यांनी विशेष परिश्रम घेतले़ यामुळे कमी वजन असलेल्या २४२ व तीव्र कमी वजन असलेल्या ६३ बालकांत सुधारणा होवून ते सर्वसाधारण श्रेणीत येत ठणठणीत झाले आहेत़ आजघडीला तालुक्यात अजूनही कमी वजन असलेले ४११ तर तीव्र कमी वजन असलेले ८३ बालके असे ४९४ बालके कुपोषित आहेत़ याबाबत एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयाकडून दुसरी मोहीम हाती घेण्यात येणार आहे़ कुपोषणमुक्तीचे कामे असेच गतिमान राहिल्यास येणाऱ्या काही महिन्यात भोकर तालुका कुपोषणमुक्त होणार आहे़
अंगणवाड्यांचे बांधकाम अर्धवट
तालुक्यातील भोसी येथील दोन, नेरली, मालदरी, किनी, मोखंडीतांडा, डोरलीतांडा येथील अंगणवाडीचे बांधकाम अर्धवट आहे़ सिंगारवाडी, बाचोटीकॅम्प, अमरूनाईक तांडा येथील अंगणवाडीच्या शौचालयाचे बांधकाम अपूर्ण आहे़ तर बोरगाव, सोमठाणा, सोमठाणातांडा, दिवशी बु़, दिवशी खु़, रायखोड व सावरगाव मेट येथील अंगणवाडी बांधकामाल निधी असूनही बांधकामाला अद्यापपर्यंत सुरुवात झाली नाही़
आयएसओसाठी प्रयत्न
भोकर तालुक्यातील लामकाणी, हळदा, मोघाळी, जामदारी, जामदरी तांडा, सावरगाव माळ, देवठाणा तांडा, पांडुरणा, किनी व दिवशी बु़ येथील अंगणवाड्या आयएसओ करण्यासाठी प्रस्तावित करण्यात आल्या आहेत़ यासाठी रंगरंगोटी, फलक आदी कामे झाली आहेत़
राजमाता जिजाऊ आरोग्य व पोषण अभियान अंतर्गत तालुक्यातील ३०५ बालकांना सर्वसाधारण श्रेणीत आणण्यात यशस्वी झालो आहे़ उर्वरित कुपोषित बालकांसाठी नव्याने प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत -
जी़जी़ सोनार, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी़