छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील २९०५ कुटुंबांना मिळणार प्रत्येकी १५ हजारांची मदत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 16:40 IST2025-10-09T16:38:30+5:302025-10-09T16:40:01+5:30
पावसाळ्यात १७ जणांचा मृत्यू, २ जखमी : १९९ जनावरे दगावली

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील २९०५ कुटुंबांना मिळणार प्रत्येकी १५ हजारांची मदत
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात गेल्या महिन्यातील १२ ते २८ सप्टेंबरदरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे २९०५ कुटुंबांचे संसार वाहून गेले. त्यांना प्रत्येकी १५ हजार रुपयांची तातडीची मदत मिळणे शक्य आहे. ४ कोटी ३५ लाखांचा हा निधी असेल. याबाबत प्रशासकीय पातळीवर माहिती संकलन सुरू आहे.
शासनाने मंगळवारी जाहीर केलेल्या पॅकेजच्या निकषामध्ये पुराने सर्वस्व वाहून नेलेल्या कुटुंबांना आधार मिळणार आहे. जिल्ह्यात १ जून ते आजपर्यंत पावसाळ्यात १७ जणांचा मृत्यू झाला; तर २ जखमी झाले. १९९ जनावरे दगावली. ३ मालमत्तांची पूर्णत: पडझड झाली. २५३ मालमत्ता अंशत: पडल्या. १ झोपडी नष्ट झाली, तर ७ गोठे बाधित झाले. ५८७ गावांतील २ लाख ६२ हजार ८४० शेतकऱ्यांची जिरायती, बागायती, फळपिकांसह २ लाख ३६ हजार ५२८ हेक्टर जमिनीचे नुकसान झाले. आजवर १४ टक्के पंचनामे झाले आहेत.
साडेचारशे कोटी शेतनुकसानीसाठी
जिल्ह्यात सुमारे साडेचारशे ते पाचशे कोटी रुपये शेतपिकांच्या नुकसानीसाठी मिळणे शक्य आहे. यात २ लाख २२ हजार ३३० हेक्टर जिरायतीच्या नुकसानीपोटी ४११ कोटी; ९ हजार ३१४ हेक्टर बागायती नुकसानीसाठी ३० कोटी; तर १५ कोटी हे ४ हजार ८८२ हेक्टर वरील फळबागांच्या नुकसानीसाठी मिळतील, असा प्रशासकीय अंदाज आहे.
किती मदत मिळणे शक्य
१७ मृत व्यक्ती : वारसांना मिळतील ६८ लाख रुपये
२ व्यक्ती जखमी : ७४ हजार ते अडीच लाख रुपये
२९०५ कुटुंबांना संसार साधने, कपडे : ४ कोटी ३५ लाख रुपये
३ घरांची पडझड : प्रत्येकी १ लाख २० हजार रुपये
३८९ घरांची अंशत: पडझड : २५ लाख २८ हजार रुपये
७ जनावरांचे गोठे : प्रत्येकी ३ हजारांप्रमाणे २१ हजार रुपये
१५९ दुधाळ जनावरे : प्रत्येकी ३२५०० प्रमाणे ५९ लाख ६२ हजार रुपये
४० ओढकाम करणारी जनावरे : प्रत्येकी ३२ हजारांप्रमाणे १२ लाख ८० हजार रुपये.