२२५ तलावांना गळती !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2016 00:05 IST2016-10-13T00:03:36+5:302016-10-13T00:05:31+5:30
उस्मानाबाद :जिल्हाभरातील सुमारे सव्वादोनशेवर तलाव गळके असल्याचा प्रकार समोर आला आहे.

२२५ तलावांना गळती !
उस्मानाबाद : तीन ते चार वर्षानंतर जिल्हाभरात वार्षिक सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. त्यामुळे पाझर तलाव, सिंचन तलाव, गावतलाव अन् प्रमुख मोठे प्रकल्पही शंभर टक्के भरले. त्यामुळे बळीराजासह ग्रामस्थ सुखावले आहेत. असे असतानाच जिल्हाभरातील सुमारे सव्वादोनशेवर तलाव गळके असल्याचा प्रकार समोर आला आहे.
मागील ३५ ते ४० वर्षांपासून या प्रकल्पासाठी शासनाने छदामही उपलब्ध करून दिलेला नसल्याने दुरुस्ती झालेली नाही. प्रकल्पांची पाणीगळती वेळीच
न रोखल्यास संबंधित प्रकल्प पूर्णक्षमतेने भरूनही भविष्यात ग्रामस्थांना टंचाईला तोंड द्यावे
लागेल !
जिल्हाभरातील बहुतांश पाझर तलाव, सिंचन तलाव, गावतलाव १९७०-७२ च्या कालावधीत बांधण्यात आले आहेत. मजुरांची गरज लक्षात घेऊन ही कामे करण्यात आली होती. त्यामुळे बहुतांश प्रकल्पांच्या बाबतीत तांत्रिक घटक फारसे पाहिलेले नाहीत. दरम्यान, प्रकल्प उभारल्यानंतर किमान दर दहा वर्षांनी त्याची डागडुजी करणे अपेक्षित असते. यामध्ये प्रकल्पाच्या पायातून होणारी गळती थांबविणे, खचलेल्या सांडव्यांची दुरुस्ती करणे, चिबड चारी दुरुस्त करणे आदी कामे करणे अपेक्षित असते. परंतु, मागील ३५ ते ४० वर्षांच्या कालावधीत या तलावांच्या दुरुस्तीकडे साफ दुर्लक्ष केले गेले. दुरुस्तीसाठी छदामही मिळाला नाही. मागील तीन-चार वर्षांत अपेक्षित पाऊस झाला नाही. त्यामुळे हे प्रकल्प कोरडेठाक होते. हे प्रकल्प दुरुस्त करण्याची हीच योग्य वेळ होती. परंतु, तसे झाले नाही.
दरम्यान, जिल्ह्यात यंदा परतीच्या पवासाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे वार्षिक सरासरीपेक्षाही जास्त पावसाची नोंद झाली. त्यामुळे विशेषत: पाझर तलाव, सिंचन तलाव, गाव तलाव तुडूंब भरले. परंतु, सव्वादोनशेवर प्रकल्प गळके असल्याने पाणी वाया जात आहे. सदरील प्रकल्पांच्या दुरुस्तीसाठी वेळोवेळी निधी उपलब्ध करून दिला असता, तर हे प्रकल्प आज सुस्थितीत राहिले असते. आणि पाणीही वाया गेले नसते, अशी प्रतिक्रीया संबंधित धरणक्षेत्रातील शेतकऱ्यांतून उमटू लागली आहे.