अतिक्रमणे हटविण्यासाठी २० जेसीबी, २०० मनपा कर्मचारी, ५०० पोलिस जालना रोडवर उतरणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 18:19 IST2025-06-25T18:18:12+5:302025-06-25T18:19:15+5:30
मनपा, पोलिस उद्या पूर्ण ताकदीने उतरणार; विरोध केल्यास फौजदारी; २० जेसीबी, २०० मनपा कर्मचारी, ८ चमू, १५ टिप्पर, ५०० पोलिस सज्ज

अतिक्रमणे हटविण्यासाठी २० जेसीबी, २०० मनपा कर्मचारी, ५०० पोलिस जालना रोडवर उतरणार
छत्रपती संभाजीनगर : खंडपीठाने मंगळवारी ग्रीन सिग्नल दिल्यानंतर महापालिका आणि पोलिस जालना रोडवरील अतिक्रमणे हटविण्यासाठी गुरुवारी (दि. २६) पूर्ण ताकदीने उतरणार आहेत. ६० मीटरच्या आत येणारी सर्व अतिक्रमणे जमीनदोस्त केली जाणार असून, त्यासाठी महापालिकेने सूक्ष्म नियोजन केले. २०० कर्मचारी, वाॅर्ड अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली ८ चमू, २० जेसीबी, ५ पोकलेन, १५ टिप्पर तैनात करण्यात येतील. वरिष्ठ अधिकाऱ्यांसह ५०० पोलिस कर्मचाऱ्यांचा ताफा महापालिकेच्या मदतीला राहणार आहे.
महापालिकेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खंडपीठाने ६० मीटर म्हणजेच १९६ फुटांच्या आत येणाऱ्या अतिक्रमणांवर कारवाई करण्याची मुभा दिली. दुभाजकापासून ३० मीटर उजवीकडे आणि ३० मीटर डावीकडे टेप लावून कारवाई सुरू केली जाणार आहे. सकाळी ९:३० ते १० पर्यंत कारवाईला सुरुवात होईल. मुकुंदवाडीपासून पुढे अतिक्रमण हटाव पथक पुढे जाईल. एकूण ८ टीम तैनात केल्या जातील. प्रत्येक टीमचे नेतृत्व वेगवेगळे वाॅर्ड अधिकारी करतील. प्रत्येक टीममध्ये एक इमारत निरीक्षक आणि बाकीचे कर्मचारी राहतील. जवळपास २०० मनपा कर्मचारी मोहिमेत सहभागी होतील.
विरोध केल्यास फौजदारी
अतिक्रमण हटाव मोहिमेला विरोध करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. गुन्हे दाखल केल्याचा तपशील खंडपीठाला सादर केला जाईल. ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले, त्यांना भविष्यात मनपा निवडणूक लढविणे अवघड होणार असल्याचेही सूत्रांनी नमूद केले.